Edinburgh Airport: भारतामध्ये हवाई वाहतूक व्यवस्थेतील अडचणीनंतर आता स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विमानतळावरही गंभीर व्यत्यय निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी एडिनबर्गमधून सुटणारी सर्व उड्डाणे अचानक थांबवण्यात आली असून विमानतळावर मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाशी संबंधित आयटी प्रणालीत अचानक बिघाड झाला. या तांत्रिक अडचणीमुळे उड्डाणांना त्वरित स्थगिती देण्यात आली. स्कॉटलंडमधील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळावर झालेल्या या बिघाडामुळे हजारो प्रवाशांना फटका बसला आहे.
हेही वाचा - IndiGo Flight Cancel: पायलट ड्यूटीत DGCA दिली थोडी सूट; इंडिगोचा गोंधळ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न
विमानतळ प्रवक्त्याने सांगितलं की, 'आमच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल प्रदात्याकडे आलेल्या आयटी समस्येमुळे एडिनबर्ग विमानतळावरून कोणतेही उड्डाण सुरू नाही. तांत्रिक पथके तातडीने दुरुस्तीचं काम करत आहेत. परिस्थिती पूर्ववत होताच अद्ययावत माहिती जाहीर केली जाईल.'
हेही वाचा - Indigo Airlines: पुण्याला जाण्यासाठी नागपूरवरुन विमानाने उड्डाण केलं पण... इंडिगोच्या ढिसाळ कारभारचा प्रवाशाला फटका
सध्या ही अडचण फक्त एडिनबर्गपुरती मर्यादित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रवाशांचा त्रास वाढत असून अनेकांना विमानतळावर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. उड्डाणांच्या नवीन वेळापत्रकासाठी आणि ताज्या माहितींसाठी प्रवाशांनी त्यांच्या संबंधित एअरलाइनशी थेट संपर्क ठेवावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. आयटी बिघाडामुळे निर्माण झालेल्या या अनपेक्षित परिस्थितीमुळे हवाई सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीतपणा निर्माण झाला असून विमानतळ प्रशासनावर ताण वाढला आहे.