Albanias AI Minister Pregnant : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आता केवळ संशोधन किंवा दैनंदिन कामांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याने प्रशासकीय कामातही हस्तक्षेप केला आहे. काही दिवसांपूर्वीच अल्बेनिया देशाने सरकारमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पहिली एआय मंत्री (AI Minister) 'डिएला' यांची नियुक्ती केली होती. आता अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी मोठी घोषणा केली आहे की, एआय मंत्री डिएला गर्भवती आहेत!
83 'एआय सहाय्यकांना' देणार जन्म
बर्लिन येथे झालेल्या ग्लोबल डायलॉग (BGD) मध्ये बोलताना पंतप्रधान एडी रामा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "आज आम्ही डिएलाबरोबर मोठा धोका पत्करला आहे. डिएला पहिल्यांदाच गर्भवती राहिली असून ती 83 मुलांना जन्म देणार आहे." ही 83 मुले संसदेतील समाजवादी पक्षाच्या प्रत्येक सदस्याचे सहकारी म्हणून काम करतील. रामा सरकारने अंदाज वर्तवला आहे की, ही प्रणाली 2026 च्या अखेरीस पूर्णपणे कार्यरत होईल.
'एआय' मुलांचे कार्य आणि आईचे ज्ञान
पंतप्रधान एडी रामा यांनी या एआय मुलांचे काम काय असेल, याचीही माहिती दिली. ते म्हणाले की, हे एआय सहाय्यक संसदेच्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक सदस्याला कामात मदत करतील. ते घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतील आणि संसदेच्या सदस्यांना तशी माहिती उपलब्ध करून देतील. विशेष म्हणजे, या मुलांकडे आईप्रमाणेच ज्ञान असेल, असा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा - Britain Crime: भारतीय महिलेवर ब्रिटनमध्ये अत्याचार, पोलिसांनी दिली माहिती
अल्बेनिया ठरला पहिला देश
सप्टेंबर महिन्यात जेव्हा डिएलाची मंत्री म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा पंतप्रधान एडी रामा यांनी तिच्या नावाची माहिती दिली होती. अल्बेनियन भाषेत 'डिएला' चा अर्थ सूर्य असा आहे. डिएला कोड आणि पिक्सेलने बनलेली असून ती मंत्रिमंडळाची एक सदस्य आहे. एखाद्या एआयला अधिकृतपणे सरकारी मंत्री म्हणून नियुक्त करणारा अल्बेनिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
पंतप्रधान रामा यांनी दावा केला होता की, "डिएला सार्वजनिक प्रकल्पांच्या निविदा 100 टक्के भ्रष्टाचारमुक्त असतील याची खात्री करण्यास मदत करेल. यामुळे सरकारला जलद आणि पूर्ण पारदर्शकतेने काम करण्यास मदत मिळेल." डिएला या वर्षाच्या सुरुवातीला ‘ई-अल्बेनिया’ सार्वजनिक सेवेत ‘व्हर्च्युअल असिस्टंट’ म्हणून दाखल करण्यात आली होती. मे महिन्यात झालेल्या संसदीय निवडणुकीत 140 पैकी 83 जागा जिंकून रामा यांच्या समाजवादी पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता मिळवली आहे.
हेही वाचा - South China Sea Crash: अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली; पायलट-क्रू सुरक्षित, तपास सुरू