Wednesday, February 18, 2026 06:15:00 PM

Palm Scan Payment: ना कॅश, ना कार्ड, ना मोबाईल… फक्त तळहात दाखवा आणि पेमेंट करा

चीनमध्ये तळहात स्कॅन करून पेमेंट करण्याची अत्याधुनिक प्रणाली सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. UPI पेक्षाही एक पाऊल पुढे असलेली ही पद्धत डिजिटल व्यवहारांच्या भविष्याची दिशा दाखवते.

palm scan payment ना कॅश ना कार्ड ना मोबाईल… फक्त तळहात दाखवा आणि पेमेंट करा

Palm Scan Payment: डिजिटल तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनने गेल्या काही वर्षांत मोठी झेप घेतली आहे. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा ते स्मार्ट शहरांपर्यंत चीन सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहे. आता या यादीत आणखी एका अत्याधुनिक पेमेंट प्रणालीची भर पडली असून, “तळहात स्कॅन करून पेमेंट” ही पद्धत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

अलीकडेच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चीनमधील 7-इलेव्हन स्टोअरमध्ये खरेदी करताना दिसते. तो एक बाटली पाणी खरेदी करतो आणि कॅश, कार्ड किंवा मोबाईल न वापरता केवळ तळहात स्कॅन करून पैसे भरतो. काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होत असल्याने अनेकांना हा प्रकार आश्चर्यचकित करणारा वाटत आहे.

हेही वाचा: FASTag Payment Error: अजब कारभार! गाडी घरी असतानाच 'फास्टॅग'मधून पैसे कट? NHAI कडून 18 लाख प्रकरणांत रिफंड

या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती सांगतो की, “हा माझा वीचॅट आयडी आहे आणि माझ्याकडे वॉलेट, कार्ड किंवा फोन नसतानाही पेमेंट झालं.” त्याचा हा अनुभव अनेकांसाठी थक्क करणारा ठरला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या.

काही युजर्सनी चीनच्या या नव्या प्रणालीची भारतातील UPI प्रणालीशी तुलना केली. काहींच्या मते, ही पद्धत UPI पेक्षाही एक पाऊल पुढे आहे. तर काही जणांनी भारतातील डिजिटल पेमेंट क्रांतीचंही समर्थन केलं. “भारतामध्येही अगदी लहान रकमेपासून डिजिटल पेमेंट वापरलं जातं,” अशी प्रतिक्रिया काही युजर्सनी दिली.

ही तळहात स्कॅन करून पेमेंट करण्याची सुविधा मे 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही प्रणाली बीजिंगच्या एअरपोर्ट एक्सप्रेस ट्रेन आणि शेंझेन विद्यापीठ परिसरात चाचणी म्हणून वापरात आणली गेली. नंतर अल्पावधीतच या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात आला आणि आज ही सेवा ग्वांगडोंग प्रांतातील 1,500 हून अधिक 7-इलेव्हन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा:Cyber Scam : सावधान! LinkedIn आणि Instagram वर पार्ट टाइम जॉब शोधताय? तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

या तंत्रज्ञानाचा वापर फक्त किराणा दुकानांपुरताच मर्यादित नाही. पॉवर बँक भाड्याने देणाऱ्या केंद्रांपासून ते वाहतूक, फिटनेस सेंटर्स, शिक्षण संस्था आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातही याचा वापर सुरू झाला आहे. वापरकर्त्यांनी एकदाच मोबाईल अॅपद्वारे नोंदणी केल्यानंतर, स्कॅनरसमोर तळहात ठेवला की व्यवहार पूर्ण होतो.

तंत्रज्ञानाच्या या वेगवान प्रगतीमुळे भविष्यात कॅश, कार्ड किंवा मोबाईलशिवाय व्यवहार करणं सामान्य होऊ शकतं. चीनची ही नवी पेमेंट प्रणाली डिजिटल व्यवहारांच्या भविष्याची झलक दाखवते, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.


सम्बन्धित सामग्री