Thursday, November 13, 2025 02:58:16 PM

Donald Trump: अणुशस्त्र चाचण्यांवरून ट्रम्प आणि पाकिस्तान आमनेसामने; आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी व्यक्त केली चिंता

आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांच्या या विधानामुळे अण्वस्त्र स्पर्धा (Nuclear Arms Race) पुन्हा पेटण्याची भीती निर्माण झाली आहे.

donald trump अणुशस्त्र चाचण्यांवरून ट्रम्प आणि पाकिस्तान आमनेसामने आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी व्यक्त केली चिंता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि चीनसह काही देश परमाणु चाचण्या (Nuclear Tests) पुन्हा सुरू करत असल्याचा दावा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर आता पाकिस्तानकडूनही प्रतिक्रिया आली आहे. इस्लामाबादने स्पष्ट केलं आहे की पाकिस्तान हा परमाणु चाचण्यांची पुन्हा सुरुवात करणारा पहिला देश नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “पाकिस्तान हा पहिला देश नाही ज्याने पुन्हा परमाणु चाचण्या सुरू केल्या आहेत. आमच्यापूर्वी काही देशांनी हे प्रयोग केले आहेत.” या वक्तव्यामुळे पाकिस्तानने ट्रम्प यांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. तथापि, अधिकाऱ्याने कोणत्या देशांनी अलीकडे अशा चाचण्या घेतल्या, याबद्दल तपशील दिलेला नाही.

दरम्यान, ट्रम्प यांनी रविवारी दिलेल्या निवेदनात रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे देश सध्या सक्रियपणे परमाणु शस्त्रांची चाचणी करत असल्याचा दावा केला होता. “रशिया आणि चीन हे चाचण्या घेत आहेत, पण ते याबद्दल बोलत नाहीत. उत्तर कोरिया निश्चितच चाचण्या करत आहे आणि पाकिस्तानदेखील त्यात सामील आहे,” असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ‘पोसाइडन’ नावाच्या परमाणु क्षमतेच्या सुपर टॉर्पेडोची यशस्वी चाचणी झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी म्हटलं, “इतर देश सतत चाचण्या करत आहेत, पण अमेरिका आता थांबली आहे. आम्हालाही आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी पुन्हा चाचण्या सुरू कराव्या लागतील.”

हेही वाचा: Mumbai Metro : मेट्रोचा प्रवास होणार अधिक सुखकर, प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय

आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांच्या या विधानामुळे अण्वस्त्र स्पर्धा (Nuclear Arms Race) पुन्हा पेटण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतासाठीदेखील ही परिस्थिती रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते, कारण पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारताचे सीमावर्ती प्रतिस्पर्धी आहेत. इतिहासात पाहिल्यास, पाकिस्तानने पहिली परमाणु चाचणी 28 मे 1998 रोजी केली होती. ही चाचणी बलुचिस्तानमधील चागाई पर्वतरांगांमध्ये करण्यात आली होती, जी भारताने केलेल्या पोखरण चाचण्यांच्या काही दिवसांनंतर घेण्यात आली होती. न्यूक्लियर थ्रेट इनिशिएटिव्ह (NTI) च्या अहवालानुसार, पाकिस्तानने आतापर्यंत एकूण सहा परमाणु चाचण्या केल्या असून त्याच्याकडे अंदाजे 170 अण्वस्त्रे असल्याचा दावा आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पाकिस्तानकडून येणारे असे अस्पष्ट संदेश हे त्याच्या परमाणु धोरणातील “धोरणात्मक अस्पष्टता” दाखवतात. मात्र, ट्रम्प यांचा दावा खरा ठरल्यास, ही परिस्थिती दक्षिण आशियाई सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरू शकते.

हेही वाचा: MSRTC Solar Energy: सौरऊर्जेतून चालणार एसटी! बसस्थानकं आणि कार्यशाळांच्या छतांवर उभारले जाणार प्रकल्प

 

सम्बन्धित सामग्री