Trump's Reaction On Nobel Prize: यंदाच्या नोबेल शांतता पुरस्काराची जगभरात चर्चा सुरू आहे. कारण, हा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचे स्वप्न भंगले. परंतु, शुक्रवारी नोबेल पुरस्कार विजेत्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी हा सन्मान डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला. परंतु या कृतीवर ट्रम्प यांनी अनपेक्षित प्रतिक्रिया दिली. 'मी असं म्हटलंच नाही की मला तो द्या,' अशा शब्दांत आता ट्रम्प यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. नोबेल समितीने 2025 चा शांतता पुरस्कार मारिया मचाडो यांना व्हेनेझुएलातील लोकशाही हक्कांसाठीच्या त्यांच्या संघर्षासाठी दिला. पुरस्कार स्वीकारताना मचाडो म्हणाल्या, 'हा सन्मान व्हेनेझुएलाच्या पीडित जनतेचा आहे आणि तो मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना समर्पित करते, ज्यांनी आमच्या स्वातंत्र्याच्या लढाईत निर्णायक पाठिंबा दिला.'
हेही वाचा - Nobel Peace Prize 2025: मारिया मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला नोबेल पुरस्कार; म्हणाल्या, 'मी हा सन्मान...'
ट्रम्प यांची प्रतिक्रिया
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की, मचाडो यांनी त्यांना फोन करून म्हटले, 'मी हा सन्मान तुमच्या नावाने स्वीकारत आहे, कारण तुम्हीच त्यासाठी खरे पात्र आहात.' यावर ट्रम्प म्हणाले, 'मी असं म्हटलं नाही की मला तो द्या. पण त्यांनी असं केलं, ही त्यांची महानता आहे. मी आनंदी आहे कारण मी लाखो जीव वाचवले आहेत.'
हेही वाचा - Bagram Base: अफगाणिस्तान बग्राम तळावर कोणत्याही परदेशी सैन्याला परवानगी देणार नाही; परराष्ट्रमंत्री मवलावी अमीर खान मुत्ताकी यांची माहिती
व्हाईट हाऊसची नोबेल समितीवर टीका
दरम्यान, व्हाईट हाऊसने नोबेल शांतता पुरस्कार समितीवर तीव्र टीका केली आहे. कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टीवन चेउंग यांनी सोशल मीडियावर म्हटले, 'नोबेल समितीने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ते शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य देतात. ट्रम्प शांतता करारांमध्ये मध्यस्थी करत राहतील, युद्धे संपवतील आणि जीव वाचवतील. कारण त्यांचं हृदय मानवतावादी आहे.' डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वीपासूनच नोबेल शांतता पुरस्काराची मागणी करत स्वतःला जगभर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा नायक म्हणून मांडले आहे. मात्र, त्यांना यंदा हा सन्मान मिळाला नाही, तरी मचाडो यांच्या या कृतीमुळे ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.