पायलट इंडोनेशियन.. इस्रायलकडून थेट नो-एन्ट्री; मध्यरात्री हवेतूनच इथिओपियन विमान माघारी धाडले, समुद्रात ओतावे लागले हजारो लिटर इंधन

'फ्लायदुबई'च्या विमानातील भीषण प्रकारानंतर समोर आलेल्या सुरक्षेतील त्रुटींमुळे इस्रायलच्या वाहतूक मंत्रालयाने जगभरातील सर्व परदेशी एअरलाइन्ससाठी अत्यंत कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Ethiopian Airlines
Ethiopian Airlines

Ethiopian Airlines Flight Denied Landing into Israel: इथियोपियाची राजधानी ॲडिस अबाबा येथून इस्रायलमधील तेल अवीवकडे निघालेल्या ‘इथियोपियन एअरलाइन्स’च्या मालवाहू विमानाला इस्रायल प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलत आपल्या हद्दीत उतरण्यास स्पष्ट नकार दिला. विमानाने उड्डाण केल्यानंतर क्रू मेंबर्सच्या यादीची पडताळणी करताना विमानाचा मुख्य कॅप्टन इंडोनेशियन नागरिक असल्याचे इस्रायली सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आले. इंडोनेशियासोबत इस्रायलचे कोणतेही राजनैतिक संबंध नसल्यामुळे आणि सुरक्षेचा गंभीर धोका लक्षात घेता हे विमान हवेतूनच माघारी धाडण्यात आले. सुरक्षित लँडिंग करण्यासाठी विमानाचे वजन कमी करणे आवश्यक असल्याने पायलटने समुद्रावर हजारो लिटर इंधनाचा निचरा केला आणि विमान पुन्हा ॲडिस अबाबात उतरवले.

पायलट बदलल्यानंतरच मिळाली इस्रायलमध्ये लँडिंगची मंजुरी
इथियोपियात विमान सुरक्षितपणे परतल्यानंतर एअरलाइन्सने त्या इंडोनेशियन वैमानिकाला तात्काळ बदलून इस्रायलची अधिकृत मान्यता असलेला दुसरा पायलट नियुक्त केला. या सर्व आवश्यक कायदेशीर व सुरक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्या विमानाला पुन्हा एकदा इस्रायलसाठी उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. मध्यपूर्वेतील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता इस्रायल आपल्या हवाई सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

‘फ्लायदुबई’ विमान हल्ल्याच्या कटानंतर इस्रायलने नियम केले अत्यंत कठोर
केवळ 2 आठवड्यांपूर्वी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात कॉकपिटमध्ये एक भीषण घटना घडली होती. ओमानच्या फर्स्ट ऑफिसरने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्येच प्राणघातक हल्ला करून इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर विमान पाडण्याचा भयंकर कट रचला होता. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला आणि सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर विमानाचे आणीबाणीच्या प्रसंगी लँडिंग करण्यात आले होते. या तपासात इराण, इराक, लेबनॉन आणि पाकिस्तानसारख्या इस्रायलविरोधी देशांचे शेकडो क्रू मेंबर्स बिनदिक्कतपणे इस्रायलमध्ये येत असल्याचे उघडकीस आले होते.

हेही वाचा – ‘भारताच्या अंतर्गत विषयात लुडबुड सहन करणार नाही…’; दिल्लीतील आंदोलनावरील वक्तव्यावरून भारताचे संयुक्त राष्ट्रांना खडेबोल

दुहेरी नागरिकत्व असलेल्या क्रू मेंबर्सवरही इस्रायलचे कडक निर्बंध
या सुरक्षेतील त्रुटींनंतर इस्रायलच्या वाहतूक मंत्रालयाने जगभरातील सर्व परदेशी एअरलाइन्ससाठी अत्यंत कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार ज्या देशांशी इस्रायलचे कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत, त्या देशांचे नागरिक इस्रायलला जाणाऱ्या कोणत्याही विमानात पायलट, कॉकपिट क्रू किंवा केबिन क्रू म्हणून सेवा देऊ शकत नाहीत. एखाद्या वैमानिकाकडे इतर मान्यताप्राप्त देशाचा पासपोर्ट असला, तरी त्याच्याकडे इस्रायलशी संबंध नसलेल्या देशाचे दुहेरी नागरिकत्व असल्यास त्याच्यावरही ही बंदी लागू राहील.

आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सवर इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्यांची कडक नजर
जगातील सर्वच आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स आता इस्रायलच्या या कठोर सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी इस्रायली सुरक्षा अधिकारी प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत. कोणत्याही नियमाचा भंग झाल्यास विमानाला प्रवेश नाकारला जाईल, असा स्पष्ट संदेश इस्रायलने दिला आहे. या नव्या नियमांमुळे जगभरातील हवाई वाहतूक कंपन्यांना इस्रायलच्या उड्डाणांसाठी आपल्या क्रू सदस्यांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागत आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! जगात तिसऱ्या युद्धाचा भडका; 24 तासांत तब्बल 1900 हून अधिक भीषण हल्ले, सौदीच्या मदतीने..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version