पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ सरकारने एक मोठा राजकीय निर्णय घेत खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांतातील सरकार बरखास्त केले आहे आणि संपूर्ण प्रांतात आणीबाणी लागू केली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (PTI) पक्षाच्या नेतृत्वाखाली हे प्रांतीय सरकार कार्यरत होते. इम्रान खान हे सध्या रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात बंदिस्त आहेत. प्रांतातील सातत्याने बिघडत चाललेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि दहशतवादी घटनांमधील प्रचंड वाढ या कारणांचा हवाला देत केंद्र सरकारने ही आणीबाणी लागू केली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी राज्यघटनेच्या कलम 232(1) आणि 234(1) अन्वये आणीबाणीची अधिकृत घोषणा केली.
प्रांतीय मंत्रिमंडळ बरखास्त; मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदे सोडण्याचे आदेश
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी जारी केलेल्या आदेशात प्रांतातील वाढते दहशतवादी हल्ले आणि तेथील घटनात्मक व्यवस्थेचा झालेला पूर्ण ऱ्हास यांचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. या आणीबाणीच्या आदेशानुसार खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री, प्रांतीय मंत्री, सल्लागार, विशेष सहाय्यक आणि ॲडव्होकेट जनरल या सर्वांना आपली पदे तात्काळ सोडावी लागतील. या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या पक्षाला आणि समर्थकांना मोठा राजकीय धक्का बसला असून पाकिस्तानमधील अंतर्गत राजकीय वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इम्रान खान यांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मोर्चादरम्यान कारवाई
खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी लागू करण्याचा हा टोकाचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा प्रांताचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य निषेध मोर्चा काढला जात होता. अडियाला तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांची तात्काळ सुटका करावी आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, ही या मोर्चाची मुख्य मागणी होती. हा मोर्चा 4 ऑक्टोबर रोजी लक्की मारवत येथून सुरू झाला होता आणि प्रांतातील अनेक जिल्ह्यांमधून पुढे जात होता. शनिवारी, 10 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू ठेवण्याचा संकल्प जाहीर केला होता; मात्र त्यापाठोपाठ केंद्र सरकारने सरकार बरखास्तीची कारवाई केली.
दरम्यान, 73 वर्षीय माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे ऑगस्ट 2023 पासून रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार, तोशाखाना प्रकरण आणि राजकीय हिंसाचार भडकवण्याशी संबंधित आरोपांसह 100 हून अधिक विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या राजकीय घडामोडी घडत असतानाच, खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी आणखी एक दुर्दैवी घटना घडली. अज्ञातांनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या झाडून संपवण्यात आलं. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दक्षिण वझिरिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या टँक जिल्ह्यातील ‘गिरह बलोच’ परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर हा हल्ला केला. या हत्येमुळे प्रांतातील कायदा-सुव्यवस्थेच्या चिंतेत आणखी वाढ झाली असून, या घटनेचा थेट संदर्भ देत सरकारने आणीबाणीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.