Wednesday, November 19, 2025 12:25:35 PM

John Kiriakou : 'पाकिस्तानची अण्वस्त्रे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली होती, परवेझ मुशर्रफनी दिलेली चावी'; माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

जॉन किरियाकौ यांनी परवेझ मुशर्रफ यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले, “पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना अमेरिकेने विकत घेतले होते आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची चावी अमेरिकेकडे होती.

john kiriakou  पाकिस्तानची अण्वस्त्रे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली होती परवेझ मुशर्रफनी दिलेली चावी माजी cia अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

US Former CIA Officer John Kiriakou : अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे (CIA) माजी अधिकारी जॉन किरियाकौ यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. जवळजवळ 15 वर्षे सीआयएमध्ये काम केलेल्या जॉन किरियाकौ यांनी दावा केला आहे की, 'पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती तथा माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी अमेरिकेला पाकिस्तानी अण्वस्त्रांचे नियंत्रण दिले होते.' त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खुलासे केले आहेत.

'मुशर्रफ यांना अमेरिकेने विकत घेतले होते'
जॉन किरियाकौ यांनी परवेझ मुशर्रफ यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले, “पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना अमेरिकेने विकत घेतले होते आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची चावी अमेरिकेकडे होती.” मुशर्रफ दुहेरी भूमिका वठवत होते, असेही त्यांनी सांगितले. “एकीकडे ते अमेरिकेला दहशतवादाविरुद्ध सहकार्य करण्याचे आश्वासन देत होते, तर दुसरीकडे ते पाकिस्तानी सैन्य आणि इतर दहशतवादी संघटनांना भारताविरुद्ध सक्रिय ठेवत असत,” असा दावा किरियाकौ यांनी केला आहे.

भारतासोबतचे युद्ध पाकिस्तान जिंकू शकत नाही
किरियाकौ यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधांवरही भाष्य केले. "भारताबरोबर लढून पाकिस्तानला कोणताही फायदा होणार नाही, हे पाकिस्तानला समजायला हवे. पाकिस्तान भारताविरोधातील कोणतेही पारंपारिक युद्ध जिंकू शकत नाही," असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - AI Layoffs: धोक्याची घंटा! मेटा, गुगल आणि अमेझॉनसह प्रमुख टेक कंपन्यांनी AI शी संबंधित नोकऱ्यांवर लावला ‘ब्रेक’

'सौदीच्या विनंतीवरून ए. क्यू. खान यांना सोडले'
पाकिस्तानला अणुशक्तीशाली बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वैज्ञानिक अब्दुल कादीर खान यांच्याबद्दलही किरियाकौ यांनी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, “जर अमेरिकेने ठरवले असते, तर आम्ही अब्दुल कादीर खान यांनाही संपवले असते, परंतु सौदी अरेबियाच्या विनंतीवरून ही कारवाई थांबवण्यात आली.” त्यावेळी सौदीला अब्दुल कादीर खान यांची गरज होती कारण ते दोघे एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत होते, असेही किरियाकौ यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण स्वार्थावर आधारित
जॉन किरियाकौ यांनी अमेरिकेच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उभे केले. “अमेरिका लोकशाहीबद्दल बोलत असली तरी अमेरिकेचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे स्वार्थावर आधारित आहे. अमेरिका मानवी हक्कांचे रक्षण करत असल्याचे दाखवते, मात्र प्रत्यक्षात फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार असतो,” असे ते म्हणाले. “खरं सांगायचं तर अमेरिकेला हुकूमशहांबरोबर काम करायला आवडतं, कारण जनमत आणि माध्यमांची काळजी करण्याची गरज नसते. म्हणून आम्ही मुशर्रफ यांना विकत घेतलं. आम्ही पाकिस्तानला लाखो डॉलर्सची मदत दिली,” असे किरियाकौ यांनी सांगितले. मुशर्रफ यांनी दहशतवादविरोधी लढाईत सहकार्याचे नाटक करून भारताविरुद्धच्या कारवाया सुरूच ठेवल्या होत्या, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा - US China Relations: आशियाई दौऱ्यादरम्यान ट्रम्प-शी जिनपिंग भेटणार! टॅरिफसह 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा


सम्बन्धित सामग्री