अमरावती शहरात कॉलेज विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला झाल्याची आणखी एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारी रोडवरील प्रो. राम मेघे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर चाकूने वार करण्यात आले. एका तरूणाने महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करून विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकूने वार केला.
या घटनेत विद्यार्थिनी जखमी झाली असून तिला उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोबत शिकणाऱ्या एका युवकावर हल्ला केल्याचा संशय आहे. आरोपी नवीन मेघराज वानवानी जखमी विद्यार्थिनीसोबत डी. फार्म द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. विद्यार्थिनीची आणि आरोपीची पूर्वीपासून ओळख असल्याचे समोर आले आहे.
घटना घडल्यानंतर कॉलेजमधील काही युवकांनी संशयित आरोपीला पकडून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिले. बडनेरा पोलीस याचा तपास करीत आहेत. तसेच पोलिसांनी सर्व बाजूंची पडताळणी सुरू केली असून, नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, अमरावती शहरात कॉलेज विद्यार्थिनीवर चाकू हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.