CBI अधिकारी असल्याची बतावणी, भावाला मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी; 15 लाख मागणारा भामटा जेरबंद

बुलढाण्यातील खामगावमध्ये सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्याची भीती दाखवत 10 ते 15 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे.
Buldhana Crime News
Buldhana Crime News

बुलढाणा : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्याची भीती दाखवत १० ते १५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला. गोपाल पोटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहरातील मोहन अरबट यांना आरोपी गोपाल पोटे याने संपर्क साधला. त्यांच्या बंधूंचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आले असल्याचे सांगत त्यांना कारवाईची भीती दाखवण्यात आली. या प्रकरणातून सुटका करून घ्यायची असल्यास मोठी रक्कम दंड म्हणून भरावी लागेल, असे आरोपीने सांगितल्याचा आरोप आहे. यासाठी तब्बल १० ते १५ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

संशय आल्याने थेट पोलिसांत धाव

सीबीआय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर मोहन अरबट यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी घाबरून पैसे देण्याऐवजी थेट खामगाव शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती देत संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान अंबिकापूर येथील गोपाल पोटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. बनावट सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याच्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

सरकारी तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगून काही व्यक्ती नागरिकांना कारवाईची भीती दाखवून पैसे मागू शकतात. अशा वेळी घाबरून जाऊन कोणालाही पैसे देऊ नयेत. संबंधित व्यक्तीच्या ओळखीची खातरजमा करावी आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.दरम्यान, खामगावमधील या घटनेत आरोपीने नेमक्या कोणत्या पद्धतीने संपर्क साधला आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version