गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात खूनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव (राका) येथे घडलेल्या 81 वर्षीय वृद्धेच्या निर्घृण हत्या आणि दरोड्याच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळी सापडलेल्या चघळलेल्या सुपारीच्या तुकड्याचा ‘डीएनए’ तपासल्यामुळे या हत्येचे बिंग फुटले. तसेच शेजारीच राहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पळसगाव (राका) येथील रहिवासी कुसुमबाई चैतराम कापगते (वय 81) या 2 सप्टेंबर 2026 रोजी घरात एकट्या होत्या. हीच संधी साधून आरोपीने घरात घुसून त्यांची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने त्यांच्या अंगावरील दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याची अंगठी आणि सोन्याचे मणी असलेली काळी पोत असा एकूण 1 लाख 32 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पोबारा केला होता. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा आणि डुग्गीपार पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, श्वानपथक, अंगुलीमुद्रा तज्ज्ञ आणि मोबाईल डेटाचे विश्लेषण करूनही सुरुवातीला पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागत नव्हता. मात्र, घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना पोलिसांना तेथे चघळलेल्या सुपारीचे काही तुकडे आढळून आले होते. पोलिसांनी हे तुकडे तातडीने न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. संशयाच्या आधारे गावातील चार जणांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपास सुरू असताना कुसुमबाई यांच्या घराशेजारी राहणारा विलास किशन मेश्राम (वय 42) याच्या रक्ताच्या नमुन्याशी ते तंतोतंत जुळले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.