मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने आरोपीने मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ३६ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आपल्या आई-वडिलांसह दोन लहान भावांसोबत राहत होती. आरोपी हा मुलीच्या वडिलांचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. आई-वडील घरात नसताना आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने त्याला विरोध केला. याच विरोधातून आरोपीने मुलीचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पहाटे वडिलांना फोन करून रचला बनाव
घटनेनंतर आरोपीने पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मुलीच्या वडिलांना फोन केला. मुलगी बेशुद्ध पडल्याचे सांगून त्याने घटनेबाबत वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वडिलांनी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
पोलिसांच्या तपासात हत्येचा उलगडा
मुलीच्या मृत्यूचे कारण संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.