उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील जाजमऊ अंतर्गत येणाऱ्या बाजिदपूर परिसरातून अंधश्रद्धा आणि मानसिक भीतीपोटी एक संपूर्ण कुटुंब उघड्यावर आल्याची अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मानसिक तणाव, भ्रामक कल्पना आणि कथित भीतीदायक स्वप्नांच्या जाळ्यात अडकून एकाच घरातील 3 सख्ख्या भावांनी अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीत आपलं आयुष्य संपवले आहे. या लागोपाठ घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संध्याकाळ होताच स्थानिक नागरिक दहशतीपोटी आपापल्या घराची दारे बंद करून घेत आहेत. 3 तरुण आणि कमावत्या मुलांचा अंत झाल्याने कुटुंबात आता केवळ वयोवृद्ध आई-वडील एकाकी उरले आहेत.
1 महिन्याच्या अंतराने 2 भावांचा मृत्यू
बाजिदपूरचे रहिवासी रामशंकर यांना विकास, गोविंद आणि अमन ही 3 मुले होती. सुमारे 8 महिन्यांपूर्वी मधला मुलगा गोविंद याला विचित्र आणि भीतीदायक स्वप्ने पडू लागली. या मानसिक आजारावर योग्य वैद्यकीय उपचार करण्याऐवजी कौटुंबिक विश्वासामुळे त्याला मांत्रिकाकडे नेण्यात आले. मात्र, परिस्थिती न सुधारल्याने होळीच्या सुमारास गोविंदाने गळफास लावून आयुष्य संपवलं. या दुर्घटनेच्या अवघ्या 1 महिन्यानंतर धाकटा मुलगा अमन याचीही मानसिक स्थिती खालावली. “मृत भाऊ स्वप्नात येऊन बोलावतो,” असा दावा करत अमनने पहिल्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. अंधश्रद्धेपोटी योग्य मानसोपचार न मिळाल्याने कुटुंबाने अवघ्या 30 ते 40 दिवसांत 2 तरुण मुले गमावली.
सर्वात मोठ्या भावानेही उचलले टोकाचे पाऊल
दोन भावांच्या अकाली जाण्याने कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा विकास हा तीव्र मानसिक तणावाखाली गेला होता. विकासचा विवाह 4 वर्षांपूर्वी झाला असून त्याला १ लहान बाळ आहे. दोन भावांचे जाणे आणि स्वप्नांच्या भीतीमुळे विकास अत्यंत खचला होता. तो कुटुंबाला रडत सांगायचा की, “दोघे भाऊ मला सोबत राहण्यासाठी बोलावतात.” कुटुंबीयांनी त्याला डॉक्टर आणि मांत्रिकांकडे नेले, परंतु त्याच्या मनातील भीती दूर होऊ शकली नाही. अखेर शनिवारी विकासनेही घराच्या 2ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करून अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.