बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मोठी स्टारकास्ट आणि बिग बजेटमुळे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. प्री-प्रमोशनपासूनच सिनेमा चर्चेत आहे.
या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांसोबत मराठमोळे चेहरेही झळकणार आहेत. यात आदिनाथ कोठारे, अजिंक्य देव आणि प्रवीण मंजरेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
एका कार्यक्रमात आदिनाथ कोठारेने शूटिंगदरम्यानचा किस्सा शेअर केला. तो म्हणाला,
“आमच्या पहिल्या सीनवेळी आम्ही सर्वजण भाऊ म्हणून एका रांगेत उभे होतो. रणबीर श्रीरामाच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आणि मी भरताच्या भूमिकेत होतो. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत होती.”
पुढे आदिनाथ म्हणाला, “तो माझा पहिलाच दिवस असल्याने मी खूप काळजीपूर्वक वागत होतो. सेटवरचं वातावरण समजून घेत होतो. तेव्हा रणबीरने माझा संकोच दूर केला. टेक सुरू होण्याआधी त्याने मला कोपर्याने हलकासा धक्का दिला आणि म्हणाला, ‘आदी, असं कर. चांगलं दिसेल…’ मी तसंच केलं. सीन झाल्यावर नितेश सर म्हणाले, ‘अरे आदी, खूप छान केलंस!’ मी म्हटलं, ‘ते मला रणबीरने सुचवलं होतं’.”
या किस्स्यानंतर आदिनाथने बॉलिवूड कलाकारांच्या स्वभावाचंही कौतुक केलं. रणबीर कपूर, साई पल्लवी यांसारखे मोठे स्टार असूनही सेटवर सर्वच कलाकार अतिशय सहकार्य करणारे आणि साध्या स्वभावाचे असल्याचं त्याने सांगितलं.
दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ दोन भागांत रिलीज होणार आहे. पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 रोजी तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.