नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट्रल पार्क येथे आयोजित सीजेपीच्या लेहरा दो तिरंगा या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी सेंट्रल पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक एकत्र जमले असून दिल्ली पोलिसांनी फौजफाटाही तैनात केला आहे. काही तासांपूर्वी ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचून दिल्ली पोलिसांनी त्यांना एक अधिकृत नोटीस बजावली होती. या नोटीसद्वारे त्यांना कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘लहरा दो तिरंगा’ निषेध मोर्चा काढण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या पथकाने राणी झाशी रोडवरील त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, एनडीएमसी (NDMC) कडून या ‘तिरंगा यात्रे’साठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. सेंट्रल पार्क हे आंदोलनासाठी अधिकृत ठिकाण नसल्यामुळे तिथे निदर्शने करण्यास बंदी आहे. अभिजीत दीपके किंवा त्यांचे समर्थक लाऊडस्पीकर आणि इतर साहित्यासह तिथे पोहोचले, तर त्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला होती. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी अखेर अभिजीत दीपके यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतेल आहे.