BJP On Rahul Gandhi: व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेता मारिया कोरिना मचाडो यांना शुक्रवारी 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. आता या पुरस्कारानंतर भारतात राजकीय वाद उभा राहिला आहे. काँग्रेसने मचाडोच्या लोकशाही हक्कांसाठीच्या संघर्षाची तुलना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी आणि मचाडो यांचा फोटो शेअर करत लिहिले, 'व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्याला संविधानाचे रक्षण केल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी लढत आहेत.' तसेच राजपूत यांनी दोन्ही नेत्यांमध्ये समानता नमूद केली आणि म्हटले की दोघेही आपल्या देशांमध्ये लोकशाही आदर्शांसाठी लढणारे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, यासाठी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत मागणी केलेली नाही.
हेही वाचा - Trump's reaction On Nobel Prize: 'मी नाही म्हटलं मला द्या...'; मारिया मचाडो यांनी नोबेल पुरस्कार समर्पित केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
भाजपची प्रतिक्रिया
काँग्रेसच्या या पोस्टवरून भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'काँग्रेस राहुल गांधींसाठी नोबेल पुरस्काराची मागणी करत आहे, हे विचित्र आहे. त्यांच्या मते, राहुल गांधींना हा पुरस्कार ढोंगीपणा, खोटेपणा, 99 वेळा निवडणुका हरल्याबद्दल आणि 1975 व 1984 मध्ये लोकशाही व संविधानावर केलेल्या हल्ल्यांबद्दल मिळायला हवा.'
हेही वाचा - Nobel Peace Prize 2025: मारिया मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला नोबेल पुरस्कार; म्हणाल्या, 'मी हा सन्मान...'
दरम्यान, व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार त्यांना देशातील लोकशाही हक्कांसाठी केलेल्या संघर्ष आणि स्वातंत्र्य रक्षणाच्या कार्यासाठी देण्यात आला आहे. मचाडोने अनेक कठीण परिस्थितींना तोंड देत नागरिकांना त्यांच्या लोकशाही हक्कांसाठी लढण्याचे मार्गदर्शन केले, तसेच सरकारच्या दडपशाही विरोधात आवाज उठवला. नोबेल समितीने त्यांना हा पुरस्कार लोकशाही, मानवाधिकार आणि शांततामय संघर्ष यासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक म्हणून दिला आहे.