Thursday, February 12, 2026 03:09:56 AM

Medical Drugs Quality:औषधं घेण्यापूर्वी हे वाचा; देशातील 'या' 167औषधांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अहवलातून आली धक्कादायक माहिती समोर

यामध्ये काही औषधे थेट बनावट असल्याचेही उघड झाले असून, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाई सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

medical drugs qualityऔषधं घेण्यापूर्वी हे वाचा  देशातील या 167औषधांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय अहवलातून आली धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात विक्रीस असलेल्या औषधांच्या गुणवत्तेबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) तपासणीअंती तब्बल 167 औषधांचे नमुने मानक गुणवत्तेत बसत नसल्याने फेल ठरवले आहेत. डिसेंबर 2025 मध्ये औषधांच्या गुणवत्तेवर आधारित ही माहिती जाहीर करण्यात आली असून, दरमहा औषधांची गुणवत्ता तपासली जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (Central Drugs Standard Control Organisation, CDSCO) ने जारी केलेल्या Drug Alert नुसार, केंद्रीय औषध प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या 74 औषधांचे नमुने Non Standard Quality (NSQ) ठरले आहेत. त्याचबरोबर राज्य औषध चाचणी प्रयोगशाळांनी तपासलेल्या 93 औषधांचे नमुनेही गुणवत्ता निकषांमध्ये अपयशी ठरले आहेत. या सर्व औषधांची सविस्तर यादी CDSCO च्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या 167 औषधांचे नमुने एक किंवा अधिक गुणवत्ता निकषांमध्ये अपयशी ठरले आहेत. जे औषधे निर्धारित गुणवत्ता मानकांवर खरी उतरत नाहीत, त्यांना NSQ म्हणून घोषित करण्यात येते. अशा औषधांचा रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांची ओळख पटवून कारवाई करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.

हेही वाचा: Local Train CCTV: मुंबई लोकलचा 'तिसरा डोळा' आता ट्रॅकवर; अपघात आणि वादांवर सीसीटीव्हीची करडी नजर

दरम्यान, डिसेंबर महिन्यात काही औषधे थेट बनावट (Fake Drugs) असल्याचेही उघड झाले आहे. गाझियाबाद येथून चार औषधांचे नमुने, तर अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration, FDA) अहमदाबाद, बिहार आणि महाराष्ट्र येथून प्रत्येकी एक नमुना बनावट आढळून आला आहे. ही औषधे इतर नामांकित कंपन्यांच्या मोठ्या ब्रँड नावांचा गैरवापर करून बाजारात विकली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

सध्या बाजारात बनावट औषधांचा सुळसुळाट वाढत असल्याचे चित्र आहे. काही कंपन्या प्रसिद्ध औषध कंपन्यांची नावे वापरून कमी दर्जाची किंवा बनावट औषधे तयार करून विक्री करत आहेत. अशा औषधांची तपासणीदरम्यान ओळख पटत असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, NSQ आणि बनावट औषधांची ओळख पटवण्यासाठी केंद्र आणि राज्य नियामकांच्या समन्वयाने ही मोहीम दरमहा नियमितपणे राबवली जाते. याचा उद्देश रुग्णांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि निकृष्ट किंवा बनावट औषधे बाजारातून तातडीने हटवणे हा आहे. औषधांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही मंत्रालयाने दिला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : "हे ढोंग उघड पडलंय...त्यांची विश्वासार्हता संपली" मनसेचा शिंदेंना पाठिंबा; कल्याणमधील प्रकारावरुन राऊत संतापले


सम्बन्धित सामग्री