उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र केदारनाथ धाम येथे आज भाऊबीजेच्या पवित्र दिवशी विधीपूर्वक दरवाजे बंद करण्यात आले. सकाळी सुमारे 8:30 वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाली. दरवाजे बंद होतानाच्या या धार्मिक सोहळ्यात हजारो भाविक उपस्थित होते आणि संपूर्ण केदार पहाड परिसर “हर हर महादेव” आणि “जय बाबा केदार”च्या जयघोषांनी दुमदुमून गेली. या वेळी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी उपस्थित राहून त्यांनीही पूजा-अर्चना केली. तर दुसरीकडे यमुनोत्री धामचे दरवाजेही दुपारी 12:30 वाजता शीतकालासाठी बंद करण्यात येणार आहेत.
ऊखीमठमध्ये होणार बाबा केदारांची शीतकालीन पूजा
दरवाजे बंद झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी भगवान केदारेश्वरांची पूजा ऊखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात केली जाईल. परंपरेनुसार, दरवाजे बंद झाल्यानंतर भगवान शिवांची चाल डोली ऊखीमठकडे रवाना झाली आहे. पहिल्या दिवशी डोलीचा रामपूर येथे मुक्काम असेल, 24 ऑक्टोबर रोजी ती गुप्तकाशी येथे पोहोचेल आणि 25 ऑक्टोबरला ऊखीमठातील शीतकालीन गादीस्थानी विराजमान होईल. सहा महिन्यांच्या या काळात भाविक ऊखीमठ येथे बाबा केदारांच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतील.
हेही वाचा: भ्रष्टाचारावर करडी नजर ठेवणारे लोकपाल आता 70 लाखाच्या महागड्या BMW कारमधून फिरणार
चारधाम यात्रेत विक्रमी भाविकसंख्या
या वर्षीच्या चारधाम यात्रेत हवामानातील अडथळे आणि बर्फवृष्टी असूनही भाविकांची उपस्थिती विक्रमी ठरली आहे. केदारनाथ धामात यंदा तब्बल 16.56 लाख भाविकांनी दर्शन घेतले, तर बद्रीनाथ धामात 14.53 लाखांहून अधिक भक्त पोहोचले. मागील वर्षी 16.52 लाख भाविक केदारनाथला आणि 14.35 लाख बद्रीनाथला पोहोचले होते. त्यामुळे या वर्षीची संख्या सर्व मागील विक्रमांवर मात करणारी ठरली आहे.
या यात्रेमुळे स्थानिक व्यापारी, हॉटेलधारक आणि पर्यटन विभागात आनंदाचे वातावरण आहे. मुसळधार बर्फवृष्टी व आव्हानात्मक परिस्थिती असूनही भक्तांची श्रद्धा आणि निष्ठा कायम राहिल्याचे यावरून स्पष्ट होते.
शिवभक्तीने दुमदुमला परिसर
दरवाजे बंद होण्याच्या या प्रसंगी संपूर्ण केदारनाथ मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. वैदिक मंत्रोच्चारात पुजार्यांनी अंतिम पूजन करून बाबा केदारांची आरती केली. भाविकांनी दीप प्रज्वलित करून भजन-कीर्तनाद्वारे आपली भक्ती व्यक्त केली. सकाळपासूनच थंडीचा जोर वाढला असतानाही मोठ्या संख्येने श्रद्धाळू मंदिर परिसरात दर्शनासाठी उपस्थित राहिले.
आता पुढील सहा महिने ऊखीमठ येथेच भगवान केदारेश्वरांची पूजा होणार आहे. प्रशासनाने भाविकांसाठी सर्व आवश्यक व्यवस्था केल्या आहेत. दरवाजे बंद होताच हिमालयीन परिसरात हिवाळ्याची सुरुवात मानली जाते. येत्या वैशाख महिन्यात जेव्हा दरवाजे पुन्हा उघडतील, तेव्हा पुन्हा एकदा “जय बाबा केदार”चे जयघोष संपूर्ण पहाडीमध्ये घुमेल.
हेही वाचा: Technical Glitch On SpiceJet Flight: स्पाइसजेटच्या दिल्ली-पटना विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाणानंतर काही वेळातच विमान परतलं