PM Modi Bhajan Clubbing: नवी दिल्लीत आयोजित एका विशेष आध्यात्मिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसोबत सहभाग नोंदवला. भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालया समोरील उद्यानात संघ परिवाराचे विचारवंत दीनदयाल उपाध्याय यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान पहिल्या रांगेत बसलेल्या पंतप्रधानांनी अचानक आपल्या सहकाऱ्याला स्वतःची वैयक्तिक डफली (तांबोरीन) आणण्यास सांगून उपस्थितांना सुखद धक्का दिला. भगवान श्रीरामाला समर्पित भक्तिगीतांच्या तालावर त्यांनी स्वतः डफली वाजवत आणि टाळ्या वाजवत भजनाचा आनंद घेतला.
‘भजन क्लबिंग’ ही नवी संकल्पना काय आहे?
पारंपरिक भक्तीसंगीत आणि आधुनिक लाइव्ह कॉन्सर्टची ऊर्जा यांचा मेळ घालत ‘भजन क्लबिंग’ ही एक नवीन संकल्पना समोर आली आहे. या संकल्पनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे पारंपारिक भजनांचे आध्यात्मिक रूप कायम ठेवून आधुनिक अकोस्टिक किंवा इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या साथीत भक्तिगीते गायली जातात. तरुण पिढी अत्यंत उत्साहाने एकत्र येऊन टाळ्या वाजवत आणि नाचत या कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. नेहमीच्या क्लब संस्कृतीच्या अगदी उलट या कार्यक्रमांमध्ये केवळ भक्तीसंगीतावर भर दिला जातो आणि मद्यपानास पूर्णपणे बंदी असते. भारतातील विविध प्रमुख शहरांसह परदेशातील भारतीय समुदायांमध्येही हे नवीन स्वरूप वेगाने लोकप्रिय होत आहे.
तरुणांचा आणि ‘जेन झी’चा उत्स्फूर्त प्रतिसाद
शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘जेन झी’ (Gen Z) आणि युवा कलाकारांची उपस्थिती लक्षणीय होती. तरुण कलाकार आणि प्रेक्षक भक्तिगीतांवर मनापासून गात आणि नाचत असताना पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. भक्तिसंगीताच्या आधुनिक सादरीकरणाला तरुणांकडून मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या कार्यक्रमातील पंतप्रधान मोदींचा डफली वाजवतानाचा आणि भजनात तल्लीन झालेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पारंपरिक संस्कृतीला आधुनिक युगातील तरुणांशी जोडणाऱ्या या उपक्रमाचे आणि त्यात पंतप्रधानांच्या या अनपेक्षित सहभागाचे नेटिझन्सकडून कौतुक केले जात आहे.