8th Pay Commission Updates: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी अत्यंत उत्सुकतेचा विषय असलेल्या 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) कामकाजाबाबत नवीन आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना केली असून, यामध्ये एकूण 3 सदस्य आहेत. विविध कर्मचारी संघटना, असोसिएशन आणि भागधारकांच्या मागण्या व शिफारसींचा सखोल अभ्यास करून 18 महिन्यांच्या आत सरकारला अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश या आयोगाला देण्यात आले आहेत. त्यानुसार, मे 2027 च्या सुमारास हा महत्त्वाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वेतन आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरील 5 प्रमुख आणि नवीन अपडेट्स
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष आयोगाच्या आगामी निर्णयांवर लागले असले, तरी फिटमेंट फॅक्टर, किमान मूळ वेतन, पेन्शन वाढ किंवा नवीन वेतन मॅट्रिक्स (Salary Matrix) यांसारख्या संवेदनशील विषयांवर आयोगाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘व्हॉट्स न्यू’ विभागात प्रसिद्ध करण्यात आलेले 5 महत्त्वाचे प्रशासकीय अपडेट्स खालीलप्रमाणे आहेत:
मुंबईतील उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन:
आयोगाच्या वतीने 21 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई भेटीबाबत अधिकृत सूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार, 22 आणि 23 ऑक्टोबर 2026 या कालावधीत मुंबईत महत्त्वाच्या बैठका पार पडल्या, ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.
सल्लागार नियुक्तीच्या नियमांत सुधारणा:
11 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या अपडेटनुसार, आयोगाने विविध सल्लागारांच्या नियुक्तीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांमध्ये अंशतः बदल केले आहेत, जे प्रशासकीय कामकाजाचा एक भाग आहेत.
जयपूरमध्ये कर्मचारी संघटनांशी संवाद:
3 ऑगस्ट 2026 रोजीच्या सूचनेनुसार, आयोगाने राजस्थानमधील जयपूर येथे 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी सल्लामसलत बैठकांचे आयोजन केले होते, ज्यासाठी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती.
बंगळुरू येथील बैठकांचे नियोजन:
24 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, बेंगळुरू शहरात 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी भागधारकांसोबत सल्लामसलत बैठका पार पडल्या. या बैठकांसाठी 18 सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम मुदत होती.
चंदीगडमधील बैठकांचा सविस्तर कार्यक्रम:
28 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार, चंदीगड येथे 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान विशेष बैठकांचे सत्र पार पडले. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.
देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये अशा प्रकारे बैठकांचे सत्र राबवून आयोग सर्वपक्षीय व कर्मचारी संघटनांच्या अडीअडचणी समजून घेत आहे.