जळगाव : जळगाव शहरालगतच्या पाळधी-तरसोद बायपासवर अपघातांची मालिका सुरूच असून, आणखी एका तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने योगेश गजमल राक्षे यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, योगेश यांचा अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाळधी रेल्वे पुलावर भीषण अपघात
योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. काम आटोपून ते दुचाकीने घरी जात असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मेट्रोने तळोजा गाठणं होणार सोपं; पहिली मेट्रो कधी धावणार?, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
बायपास धसल्यानंतर अपघातांत 13 जणांचा मृत्यू
पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. 30 जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली. परिणामी, शहरातील विविध मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचे चित्र आहे.
जुलै महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावर 25 अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवविवाहित तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
योगेश राक्षे यांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. संसाराची नव्याने सुरुवात केलेल्या योगेश यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.