Bomb Threats to International Airports: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अजून एक मोठा सुरक्षा इशारा समोर आला आहे. इंडिगो एअरलाइन्सला बुधवारी दुपारी 3:30 वाजता ईमेलद्वारे पाच प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. या यादीत दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या विमानतळांचा समावेश आहे. ईमेल आल्यानंतर तात्काळ सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या असून या धमक्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनुसार ही धमकी बनावट (Hoax) असल्याचे दिसून आले आहे, तरीही देशातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्ली विमानतळावर खळबळ
दरम्यान, दुपारी 4 वाजता दिल्ली विमानतळावर अग्निशमन दलाला टर्मिनल 3 वर बॉम्बची माहिती मिळाली. घटनास्थळी केलेल्या तपासणीनंतर ही धमकी बनावट असल्याचे सिद्ध झाले. प्राप्त माहितीनुसार, इंडिगोच्या तक्रार पोर्टलवर ईमेल प्राप्त झाला होता आणि त्यात दिल्ली, चेन्नई आणि गोवा यासह इतर अनेक विमानतळांचा उल्लेख होता.
एअर इंडिया एक्सप्रेसलाही धमकी
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटला उड्डाणादरम्यान बॉम्बची धमकी मिळाल्याने लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि विमान ताबडतोब आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
हेही वाचा - Delhi Blast Update: फरीदाबादमध्ये सापडली दिल्ली स्फोटाशी संबंधित इको स्पोर्ट्स कार; उमर नबी आणि शाहीनबद्दल मोठा खुलासा
दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाराणसीला जाणाऱ्या आमच्या एका विमानाला सुरक्षेचा धोका मिळाला होता. प्रोटोकॉलनुसार, सरकारने नियुक्त केलेल्या बॉम्ब धोक्याचे मूल्यांकन समितीला तात्काळ कळवण्यात आले आणि सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आल्या. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. सर्व अनिवार्य सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यात येईल.
हेही वाचा - Air India Express Bomb Threat: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बची धमकी; लाल बहादूर शास्त्री करण्यात आले आपत्कालीन लँडिंग
सुरक्षा यंत्रणांना सतर्कता निर्देश
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर, देशभरातील विमानतळांवरील सुरक्षा संस्थांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षा देखील कडक करण्यात आली आहे. विमानतळांच्या आत आणि बाहेर सीआयएसएफ आणि विमानतळ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तथापी, श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहे.