गोंदिया: तांदळाच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम आता धानाच्या बाजारभावावरही दिसून येत आहे. दरवर्षी साधारण 2800 रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या धानाला यंदा तब्बल 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धानाच्या दरात झालेली ही वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. विशेषतः उत्कृष्ट प्रतीच्या बारीक धानाला बाजारात चांगली मागणी असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
‘जय श्रीराम’ धानाला सर्वाधिक भाव
गोंदिया जिल्ह्यातील बाजारपेठेत उत्कृष्ट प्रतीच्या ‘जय श्रीराम’ धानाला सर्वाधिक 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. तर वर्षा धानालाही 4 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा धानाच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.
धानाची आवक घटल्याने दरात वाढ
यंदा अपुऱ्या पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीवर परिणाम झाला आहे. त्यातच रोग आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे धान पिकाचे नुकसान झाले. परिणामी बाजारपेठेत विशेषतः बारीक धानाची आवक घटली आहे. दुसरीकडे तांदळाला बाजारात चांगली मागणी असल्याने धानाच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने धानाचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे.
पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता
तांदळाच्या दरात झालेली वाढ आणि बारीक वाणाच्या धानाची कमी आवक पाहता आगामी काळात धानाच्या बाजारभावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला, तरी पुढील काळात बाजारभाव कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update