कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शामराव पाटील शिक्षण संकुलाच्या निवासी शाळेतील (Residential School) विद्यार्थ्यांवर रॅगिंग (Ragging) झाल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Kolhapur School Ragging Video Viral) समोर आल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी (Senior Students) ज्युनियर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे पालक वर्गात प्रचंड चिंता आणि संताप व्यक्त होत आहे.
मारहाणीचा प्रकार: व्हिडिओमध्ये मोठी मुले लहान मुलांना एका ओळीत (Line) उभे करून चामडी पट्ट्याने, हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि क्रिकेट बॅटने मारहाण करत आहेत. या अमानुष माराहाणीमुळे लहान मुले मोठमोठ्याने रडत असतानाही मोठ्या मुलांना दया येत नसल्याचे संतापजनक चित्र या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुलांमधील अशा प्रवृत्तींमुळे चिंताही व्यक्त होत आहे.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह: ही घटना घडत असताना परिसरात शिक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर (Negligence) आणि नियंत्रण ठेवण्याच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आपल्या मुलांचे शिक्षण आणि संस्कारांसाठी वसतिगृहात पाठवणारे पालक आता त्यांच्या सुरक्षेबद्दल साशंक झाले आहेत. विद्यार्थ्यांवर अशी मानसिक व शारीरिक छळवणूक होणे हे समाज म्हणून लाजिरवाणे असल्याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.
माजी विद्यार्थ्यालाही मारहाण
दरम्यान, या संकुलात सिध्दीविनायक गौतम मोहिते (रा. उचगांव) नावाचा दहावीत शिकणारा विद्यार्थी आणि त्याच वर्गातील पृथ्वीराज कुंभार यांच्यात वाद झाल्यानंतर तो मिटवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर रेक्टर राहुल कोळी याने सिध्दीविनायकला पी.व्ही.सी. पाईपने पार्श्वभागावर आणि डोक्यात मारहाण केल्याने तो जखमी झाला होता आणि त्याच्यावर उपचारही करण्यात आले होते.
प्रशासनाकडून चौकशी सुरू
या व्हायरल व्हिडिओबद्दल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी हा व्हिडिओ पूर्वीचा (Old Video) असल्याचे सांगितले आणि सध्या माहिती घेत असल्याचे नमूद केले. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शिवसेना आणि शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीसह सामाजिक संघटनांनी जिल्हा शिक्षण अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच बालहक्क आयोगाने याची तत्काळ दखल घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची आणि पीडित विद्यार्थ्यांचे समुपदेशन (Counselling) करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - CM Devendra Fadnavis On Gun License : 'परवानाच दिला नाही...'; फडणवीसांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदमांची पाठराखण
शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती आक्रमक
कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांवर झालेल्या रॅगिंगच्या (Ragging) घटनेनंतर शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी याबाबत आवाज उठवला आहे. फोंडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापनावर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत. या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. "शिक्षणाधिकारी (Education Officer) यांनी तात्काळ घटनेची नोंद घेऊन शाळेला भेट द्यावी आणि शालेय व्यवस्थेवर कारवाई केली पाहिजे," अशी मागणी कृती समितीने केली आहे.
व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
'तळसंदे येथे उघडपणे बराच वेळ 'फ्री स्टाईल' मारहाण (Free Style Beating) होत असताना, शाळेचे व्यवस्थापन (School Management) काय करत होते?' हा प्रश्न प्रत्येक पालक आणि संवेदनशील व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. ही गोष्ट मारहाणीपर्यंत पोहोचण्यापूर्वी काहीतरी धुसफूस सुरू असणार, यामध्ये तेथील शाळा व्यवस्थापनाने लक्ष घालायला पाहिजे होते, मात्र तसे दिसून येत नाही. यावरून व्यवस्थापनाच्या दुर्लक्षावर शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे.
कठोर कारवाई आणि आंदोलनाचा इशारा
बाल हक्क कायद्यांतर्गत कारवाई आवश्यक: मारहाण झालेले सर्व विद्यार्थी 18 वर्षांखालील (Under 18) दिसत असल्याने, बाल हक्क कायद्यातील (Child Rights Act) तरतुदीनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई किंवा समुपदेशन, (Counselling) करणे, समज देणे गरजेचे आहे.
व्यवस्थापनावर कारवाई: शाळा, शिक्षण विभाग आणि पोलीस विभागामार्फत शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. जर ही कारवाई झाली नाही, तर यावर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana : योजनेचे पैसे मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींची कसरत; ओटीपीकरता चढताहेत उंचच्या उंच डोंगर