कीर्तनाहून घरी परतताना काळाचा घाला! भरधाव कंटेनरच्या धडकेत आजीसह दोन नातवंडांचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील आंबळे येथे कीर्तनाहून पायी घरी परतणाऱ्या झेंडे कुटुंबाला भरधाव कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात आजीसह दोन नातवंडांचा जागीच मृत्यू झाला असून गावावर शोककळा पसरली आहे.

कीर्तनाहून घरी परतताना काळाचा घाला! भरधाव कंटेनरच्या धडकेत आजीसह दोन नातवंडांचा मृत्यू

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आंबळे येथील झेंडे कुटुंबावर काळाने घाला घातला असून, भरधाव कंटेनरच्या धडकेत आजीसह दोन नातवंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिरूर-सातारा महामार्गावर हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे आंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे कुटुंबातील सदस्य कीर्तन ऐकून पायी घरी परतत होते. त्याचवेळी महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत कौशल्या वसंत झेंडे, आरुषी दत्तात्रय झेंडे आणि सोहम राजीव झेंडे यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील आजी आणि दोन नातवंडांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने झेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कीर्तन ऐकून आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर काही क्षणांतच दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, अपघातानंतर संबंधित कंटेनरचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भीषण अपघातामुळे आंबळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number