मुंबई: पाच दिवसांच्या खंडानंतर अखेर आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक पुन्हा प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं आहे. शनिवार (31 मे) रोजी दुपारी एक वाजल्यापासून ही सेवा पुन्हा सुरू झाली. एक्वा लाईन 3 अंतर्गत येणारं हे स्थानक मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आलं होतं.
मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील वाहतूक आणि सार्वजनिक सेवांवर मोठा परिणाम झाला. विशेषतः आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने संपूर्ण प्लॅटफॉर्म जलमय झाला होता. पाण्यासोबत आलेल्या गाळामुळे प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ मेट्रो सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला.
पाच दिवस प्रशासनाकडून युद्धपातळीवर साफसफाई आणि दुरुस्तीचं काम सुरू होतं. स्थानकातील पंपिंग यंत्रणेद्वारे पाणी बाहेर काढण्यात आलं. तसेच, तांत्रिक यंत्रणा तपासून पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व सुरक्षा चाचण्या पार पाडण्यात आल्या. यामध्ये प्लॅटफॉर्मवरील विजेची व्यवस्था, लिफ्ट्स आणि सीसीटीव्ही प्रणालींची तपासणीही समाविष्ट होती.
हेही वाचा: पावसाळ्यात बाथरूममध्ये गांढूळ, गोम आणि कीटकांचा उच्छाद? 'या' सोप्या घरगुती उपायांनी करा त्यांचा बंदोबस्त
शनिवारी सकाळपर्यंत स्थानक पुन्हा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली होती आणि दुपारी एक वाजता मेट्रो सेवा सुरू झाली. प्रवाशांनीही या सेवेचे स्वागत केलं असून, स्थानक सुरू झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय.
एक्वा लाईन 3 ही मुंबईच्या मध्यवर्ती भागांना जोडणारी महत्त्वाची मेट्रो लाईन आहे. आचार्य अत्रे चौक स्थानक हे गिरगाव, चौपाटी आणि मुंबई सेंट्रल परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच असा प्रकार घडल्यामुळे आगामी महिन्यांमध्ये मुंबई मेट्रो व्यवस्थापनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठी अधिक सुधारित उपाययोजना करण्यात येतील, अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील भूमिगत मेट्रो पुन्हा सुरळीत रुळावर आली असून, मुंबईकरांना आता त्यांच्या दैनंदिन प्रवासात दिलासा मिळालाय.