जळगाव शहरात रसवंतीच्या गाडीवर करण्यात आलेल्या कारवाईच्या संतापात एका तरुणाने थेट महापौरांच्या वाहनांची तोडफोड केली आहे. जळगाव शहरात महापालिका आवारात महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहर पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या रसवंतीच्या गाडीवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली होती.
याचाच राग मनात ठेऊन संतप्त तरुणाने थेट महापालिका आवारात जाऊन महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला केला. इतकचं नव्हे तर अतिक्रमण निर्मूलन विभागाने रसवंतीची गाडी जप्त केल्यानंतर संबंधित तरुणाने महापालिकेत येऊन गोंधळ घातला. या तोडफोडीत महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. वाहनचालकाने त्याला दूर केल्याने पुढील अनर्थ टळला.
शासकीय यंत्रणेकडून करण्यात आलेल्या कारवाईचा राग अशा प्रकारे व्यक्त करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर महापौरांनी आयुक्तांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले, तसेच महापालिकेत सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे आदेश दिले.
या घटनेमुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली असून, महापौरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे जळगाव महापालिकेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था, अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान निर्माण होणारे वाद आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई केली जाते आणि संबंधित तरुणाविरोधात कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.