Chandwad Accident: चांदवडच्या कानडगावजवळ भीषण अपघात; पुणे-इंदूर महामार्गावर दोन ट्रकची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

पुणे-इंदूर महामार्गावर चांदवड तालुक्यातील कानडगावजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

Chandwad Accident: चांदवडच्या कानडगावजवळ भीषण अपघात; पुणे-इंदूर महामार्गावर दोन ट्रकची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
चांदवडमध्ये दोन ट्रकची जोरदार धडक

चांदवड : पुणे-इंदूर महामार्गावर चांदवड तालुक्यातील कानडगावजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-इंदूर महामार्गावरून दोन ट्रक जात असताना कानडगाव परिसरात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रकमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा: Sunetra Pawar: ‘मी स्वतः शेतकरी अन् मराठवाड्याची लेक…’; नांदेडमध्ये शेताच्या बांधावर सुनेत्रा पवारांनी बळीराजाला दिला धीर

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये समी खान आणि अब्दुल रहीम बोहरी, हे दोघे कर्नाटक येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तसेच वसीम अक्रम खान, रतलाम, मध्य प्रदेश येथील रहिवासी यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. आयान शेख आणि शोएब खान हे दोघे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. दुर्घटनेमुळे दोन्ही ट्रक रस्त्यावरच आल्याने महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू केले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा: Talukas Drought List Maharashtra: तुमचा तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे का? 6 विभागांतील ‘या’ 265 तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर

दरम्यान, दोन अवजड वाहनांची समोरासमोर धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. चालकांचे नियंत्रण सुटणे, वेग किंवा इतर कोणते कारण या दुर्घटनेमागे होते का, याचा तपास केला जात आहे. अपघातातील मृतांची ओळख आणि जखमींची वैद्यकीय स्थिती याबाबत पोलिसांकडून पुढील माहिती घेतली जात आहे.

पुणे-इंदूर महामार्गावर झालेल्या या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि सुरक्षित अंतर राखण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number