Pimpri Chinchwad Accident : देशभरात सण-उत्सवाचा आनंद असतानाच पिंपरीतील काळेवाडी परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ऋतुजा आणि नेहा या दोन सख्ख्या बहिणींचा करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पुनावळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमका अपघात कसा झाला?
पुनावळे येथील रहिवासी असलेल्या ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय 24) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय 20) या दोघी आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त निघाल्या होत्या. काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिराजवळील पेट्रोल पंपापाशी त्या पोहोचल्या असता, पाठीमागून आलेल्या एका भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
हेही वाचा - Navi Mumbai Crime : उमेदवाराच्या कारखाली लिंबू-मिरच्या अन् टाचण्या टोचलेली बाहुली...नवी मुंबईत मतदानापूर्वी जादूटोण्याचा प्रकार
दुचाकीचा चक्काचूर
दरम्यान, ही धडक इतकी वेगवान आणि भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. दोन्ही बहिणी रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु दुर्दैवाने उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. ऐन संक्रांतीच्या दिवशी दोन तरुण मुलींच्या मृत्यूने त्यांच्या आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.
ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात
अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक चालक जितेंद्र निराले याला काळेवाडी पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचे समजते. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
हेही वाचा - Sujay Vikhe-Patil : 'कायदा जर कुणी हातात घेणार असेल तर आम्ही...'; सुजय विखे यांचा विरोधकांना कडक शब्दांत इशारा
वाढत्या अपघातांमुळे नागरिकांत संताप
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जड वाहनांची वर्दळ आणि त्यांच्या बेफाम वेगामुळे निष्पाप जीवांचे बळी जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोन तरुण बहिणींच्या अकाली निधनामुळे वाहतूक प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.