Duronto Express: दुरंतो एक्स्प्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक; तीन डब्यांच्या काचा फुटल्या,प्रवासी…

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर बुटीबोरी-बोरखेडीदरम्यान अज्ञातांकडून दगडफेक झाली.
नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक
नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक

नागपूर : नागपूरहून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरी आणि बोरखेडी रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या या दगडफेकीत गाडीच्या तीन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून रेल्वे प्रशासनाने तातडीने गाडीची तपासणी करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 12290 दुरंतो एक्स्प्रेस नागपूरहून मुंबईकडे रवाना झाली होती. बुटीबोरी स्थानक पार केल्यानंतर आणि बोरखेडी स्थानकापूर्वी अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीचा फटका A1, B2 आणि B5 या डब्यांना बसला असून डाव्या बाजूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

हेही वाचा: Chandwad Accident: चांदवडच्या कानडगावजवळ भीषण अपघात; पुणे-इंदूर महामार्गावर दोन ट्रकची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर दुरंतो एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबवण्यात आली. जवळपास अर्धा तास सर्व डब्यांची सखोल तपासणी करण्यात आली. फुटलेल्या काचा आणि इतर संभाव्य नुकसानाची पाहणी करण्यात आली.

घटनेनंतर रेल्वे डॉक्टरांनाही गाडीत बोलावण्यात आले. त्यांनी सर्व डब्यांमधील प्रवाशांची विचारपूस केली आणि वैद्यकीय तपासणी केली. मात्र, कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे काही काळ निर्माण झालेली भीती दूर झाली आणि त्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

हेही वाचा: Sunetra Pawar: ‘मी स्वतः शेतकरी अन् मराठवाड्याची लेक…’; नांदेडमध्ये शेताच्या बांधावर सुनेत्रा पवारांनी बळीराजाला दिला धीर

दरम्यान, या दगडफेकीची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. घटनेची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसह SIB आणि CIB यांनाही देण्यात आली असून, दगडफेक करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा यंत्रणा संबंधित परिसरातील हालचालींची चौकशी करत असून या प्रकारामागील कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

धावत्या रेल्वेवर दगडफेक होण्याच्या घटना प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर मानल्या जातात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने संबंधित मार्गावरील सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यावर भर दिला आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version