दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भेसळयुक्त अन्नाची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मोठी धडक मोहीम राबवली आहे. 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी एफडीएच्या विशेष पथकांनी राज्यातील 14 विविध कारखाने व दुकानांवर अचानक छापे टाकले. या धाडीदरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा तब्बल 25 लाख 53 हजार 758 रुपयांचा भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचा माल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत जप्त करण्यात आलेला खाद्यपदार्थांचा साठा
तपासणी मोहिमेत पथकाने 9,385 किलोचे विविध अन्नपदार्थ आणि 7,566 कालबाह्य पॅकबंद खाद्यपदार्थांची पाकिटे जप्त केली. यासोबतच 7,104 शीतपेयांच्या बाटल्या आणि 88 लिटर दूध ताब्यात घेण्यात आले आहे. सण-उत्सवाच्या काळात सर्वाधिक मागणी असणारे मावा, विविध प्रकारची मिठाई, ड्रायफ्रूट्स, चिवडा, शेव, चिप्स, खोबरा पावडर, गव्हाचे पीठ, सोया चंक्स आणि गुलाबजाम मिक्स यांसारख्या दैनंदिन वापरातील पदार्थांचा या जप्त केलेल्या साठ्यात समावेश आहे.
अस्वच्छता व नियमांचे उल्लंघन; 7 विभागांमध्ये छापे
ही कारवाई बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या 7 प्रशासकीय विभागांमध्ये पार पडली. विनालेबल पदार्थांची विक्री करणे, अत्यंत अस्वच्छ जागेत अन्न शिजवणे किंवा पॅक करणे, तसेच कालबाह्य साठा लपवून ठेवणे अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्यानंतर हा सर्व माल सील करण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर आणि व्यापाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले साईबाबा संस्थान! इतक्या कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द
व्यापाऱ्यांना सूचना आणि ग्राहकांसाठी सुरक्षा मार्गदर्शक
अन्नधान्य व खाद्यपदार्थांची विक्री नेहमी स्वच्छ ठिकाणी आणि योग्य लेबल लावूनच करावी, असे कडक निर्देश एफडीएकडून सर्व व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी सुटे किंवा लेबल नसलेले अन्नपदार्थ खरेदी न करता, खरेदी करताना पॅकिंगची तारीख, बॅच नंबर आणि ‘Best Before’ तपासूनच वस्तू घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. बाजारात कोणताही संशयास्पद किंवा हलक्या दर्जाचा साठा आढळल्यास 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा एफडीएच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.