हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; 2 जणांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जण जखमी

हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; 2 जणांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जण जखमी
Hingoli Fire

हिंगोली : हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीने काही क्षणांतच मोठे रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गोदामात मोठ्या प्रमाणात फटाके साठवून ठेवण्यात आल्याने आगीदरम्यान सतत फटाक्यांचे स्फोट होत आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आग विझवण्याचे काम सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या गाडीलाही आगीची झळ बसल्याची माहिती आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला असून, आगीच्या भीषणतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, रहिवासी भागात फटाक्यांचा एवढा मोठा साठा ठेवण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोदामातील फटाके एकामागून एक फुटत असल्याने आगीच्या ठिकाणी जाणे आणि बचावकार्य करणे कठीण होत आहे. स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

या दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 10 ते 12 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेहही रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गोदामात फटाक्यांचा मोठा साठा असल्याने आग पूर्णपणे विझवण्यासाठी वेळ लागत आहे. या गोदामात एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके कशा परिस्थितीत साठवण्यात आले होते, तसेच आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचा तपास प्रशासनाकडून केला जाण्याची शक्यता आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number