मुंबई: ईशाच्या स्वयंसेवकांनी आज मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात ‘कैलाश वाद्यम्’ ही पवित्र नादसेवा प्रथमच रुजू केली. मंदिरात संपन्न झालेल्या आदियोगींच्या मंगल पालखी सोहळ्यानंतर ही सेवा समर्पित करण्यात आली.
या पावन प्रसंगी अनंत अंबानी आणि आकाश अंबानी यांनी आदियोगींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. या सोहळ्यात सहभागी झालेल्या मराठी अभिनेत्री मुग्धा चाफेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मंगल वाद्यांच्या आणि संगीताच्या पवित्र नादतरंगांमुळे गजबजाटातही मला एका अथांग शांतीची अनुभूती लाभली. हे अत्यंत नयनरम्य आणि विलोभनीय दृश्य होते; ज्यायोगे मला अंतर्यामी एक अलौकिक शांतता अनुभवता आली.
’कैलाश वाद्यम्’ म्हणजे प्रत्यक्ष आदिदेव शिवाची तपोभूमी असलेल्या कैलासातील नादब्रह्म. पारंपरिक आणि मंगल वाद्यांच्या दिव्य ध्वनितरंगांद्वारे, ज्या ज्या स्थानी ही सेवा घडते तेथे प्रत्यक्ष कैलास पर्वताची अनुभूती देणारे आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे हा यामागील मुख्य हेतू आहे. भक्तीरसात लीन झालेले हे ‘कैलाश वाद्यम्’ जिवाला शिवतत्त्वाची अनुभूती घेण्यास साहाय्यभूत ठरते.
उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात ही सेवा अर्पण केल्यानंतर, आता महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांमध्ये प्रथमच ‘कैलाश वाद्यम्’चे आयोजन होत आहे. यापुढील सेवा २९ ऑक्टोबर रोजी चेंबूर येथील श्री भुलिंगेश्वर मंदिरात सकाळी ८:३० ते ९:३० या वेळेत, आणि त्यानंतर ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिरात सायंकाळी ६:३० ते रात्री ९:३० या वेळेत सादर केली जाईल.
यानंतर हा समूह नाशिक आणि पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल. ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकच्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत ‘कैलाश वाद्यम्’ सादर होईल. १ नोव्हेंबर रोजी पुण्यातील श्री सोमेश्वर मंदिरात सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत आणि त्यानंतर जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात दुपारी ३:३० ते ५:३० या वेळेत ही नादसेवा संपन्न होईल.
उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून पवित्र रुद्राक्ष आणि विभूती प्रदान करण्यात येईल. या उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना आपापल्या नजीकच्या शिवमंदिरांत ‘कैलाश वाद्यम्’चा अलौकिक अनुभव घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
कोणत्याही शिवमंदिरात ‘कैलाश वाद्यम्’ ही सेवा विनामूल्य सादर केली जाऊ शकते. आपल्या मंदिरात ही सेवा आयोजित करू इच्छिणाऱ्या विश्वस्तांनी ईशाशी ८३००० ८३१११ या क्रमांकावर अथवा info@shivanga.org या संकेतस्थळ पत्त्यावर संपर्क साधावा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.