Ujjwal Nikam PC: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालेदार यांनी आरोपीला दुर्मिळातील दुर्मिळ केस मानत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा निकाल अवघ्या 10 महिन्यांच्या जलदगती प्रक्रियेत लागला असून, निर्भया प्रकरणाशी तुलना करत न्यायालयाने ही घटना अत्यंत भयावह असल्याचे अधोरेखित केले आहे.
‘..तर समाजात अशी दुष्कृत्ये पुन्हा’
या ऐतिहासिक निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. केवळ त्या गुन्हेगारालाच शिक्षा झाली पाहिजे असे नाही, तर समाजात अशी दुष्कृत्ये पुन्हा कोणीही करू नये, असा एक कठोर आणि भक्कम संदेश समाजात जावा, याकरिता आपण कठोर शिक्षेची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – मोठी बातमी! डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निकाल; आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा
‘कठोर शिक्षेचा खरा उद्देश तेव्हाच साध्य होतो..’
पुढे बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, या प्रकरणाची उच्च न्यायालयात लवकरात लवकर सुनावणी होऊन फाशीची शिक्षा कायम होईल, अशी आपल्याला आशा आहे. कठोर शिक्षेचा खरा उद्देश तेव्हाच साध्य होतो जेव्हा खटल्याची सुनावणी आणि अंमलबजावणी विनाविलंब जलद गतीने होते. उच्च न्यायालयात हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निघेल आणि पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेल, असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हा नराधम कधीही सुधारू शकणार नाही असा युक्तिवाद
ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती देताना सांगितले की, ही अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ घटना असून पीडित मुलगी त्या नराधमाला ‘दादा’ म्हणायची आणि त्याच्याच बोट धरून विश्वासाने गेली होती. आरोपीने आधी कॅटबरीचे आमिष दाखवून आणि आजूबाजूला कोणी पाहत नाहीये हे तपासत चिमुरडीचा विश्वास संपादन करून हे निर्दयी कृत्य केले. विशेष म्हणजे, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रणादरम्यानही या आरोपीच्या चेहऱ्यावर कृत्याचा कोणताही पश्चाताप दिसून आला नाही, त्यामुळे हा नराधम कधीही सुधारू शकणार नाही असा युक्तिवाद आम्ही न्यायालयात केल्याचे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.