ठाणे : ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. या प्रकरणाच्या सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत असून, तपासातून नेमका दोषी कोण हे समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यापलीकडे या प्रकरणावर मला अधिक बोलायचे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
‘दुर्दैवी घटनेने आम्हालाही दुःख’
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मिनाक्षी शिंदे यांनी चितळसर-मानपाडा परिसरातील घटनेचा उल्लेख केला. आपल्या प्रभागात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले. या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये आपल्यावर विविध आरोप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मिनाक्षी शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सुरुवातीला नोंदवलेल्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव नव्हते. मात्र, त्यानंतर राजकीय नेत्यांकडून आपले नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. कोणतेही पुरावे नसताना आपल्यावर आरोप केले जात असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
‘20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असं राजकारण पाहिलं नाही’
या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मिनाक्षी शिंदे यांनी टीका केली. मृत व्यक्तीच्या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाणे शहरात आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर आणण्यात आल्याचा उल्लेख करत, या घटनेलाही राजकीय रंग देण्यात आल्याचे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या. पुरवणी एफआयआरमध्ये आपले नाव नंतर समाविष्ट करण्यात आल्याचा दावा करत, ‘उद्या कुठे विमान हायजॅक झाले तरी माझे नाव घेतले जाईल,’ अशा शब्दांत त्यांनी आरोपांवर नाराजी व्यक्त केली. आपल्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत इतक्या खालच्या पातळीचे राजकारण प्रथमच पाहत असल्याचेही त्या म्हणाल्या.
दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख
यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. दिशा सालियन यांचे वडील अनेक वर्षांपासून पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेत पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी म्हटले. दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित सीबीआयच्या सप्टेंबर 2026 मधील एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह काही व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख आहे. मात्र, एफआयआरमध्ये नाव असणे म्हणजे संबंधित व्यक्ती आरोपी ठरते असे नाही; तपासात भूमिका निश्चित होणे आवश्यक आहे.
याच मुद्द्यावरून मिनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत यांना सवाल केला. दिशा सालियनदेखील कोणाची तरी मुलगी होती, मग या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘मला अटक करा म्हणणाऱ्यांनी आधी दिशा सालियन प्रकरणावर बोलावे’
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आपले नाव जबरदस्तीने टाकण्यात आल्याचा आरोप करत, मला अटक करा अशी मागणी करणाऱ्यांनी आधी दिशा सालियन प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी, असे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांचा वापर केला, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच, या प्रकरणातील पुरावे नष्ट केले असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून सुरू असून, तपासाच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकही कार्यरत आहे.