मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शनिवार आणि रविवारच्या विकेंडला रेल्वेच्या विविध मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर लोकलच्या वेळापत्रकात बदल होणार असून, काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक असेल. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासून घ्यावे.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवार, २५ ऑक्टोबर रोजी माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद लोकल माटुंगा स्थानकावरून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान नियोजित स्थानकांवर थांबतील. त्यामुळे त्या गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.
ठाण्याहून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद लोकलही मुलुंड ते माटुंगा या दरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. खोपोलीहून दुपारी १.४८ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल बदललेल्या वेळेनुसार दुपारी २.०६ वाजता सुटेल.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी लोकल सेवा प्रभावित
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल.
या कालावधीत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान सुटणाऱ्या अनेक लोकल रद्द राहतील. तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान येणाऱ्या लोकल सेवांवरही परिणाम होईल.
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या मार्गांवर विशेष लोकल चालवण्यात येतील. याशिवाय, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी आणि नेरुळदरम्यान प्रवास करता येईल.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर शनिवार, २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक असेल. हा ब्लॉक रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० या वेळेत घेण्यात येणार आहे.
या काळात सर्व जलद लोकल सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्दही केल्या जाणार आहेत. मात्र, पश्चिम रेल्वेवर रविवारी स्वतंत्र मेगाब्लॉक नसणार आहे.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
मेगाब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल आणि प्रवासाला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा. शक्य असल्यास रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करावे. विशेषतः हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी रद्द झालेल्या लोकल आणि पर्यायी सेवांची माहिती घेऊनच स्थानक गाठावे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.