Mumbai Plastic Ban: मुंबईकरांनो सावधान! प्लास्टिक वापरल्यास हजारोंचा दंड; पालिकेची कडक मोहीम

मुंबईत प्लास्टिकबंदीची मोहीम अधिक तीव्र होणार आहे. फेरीवाले, दुकानदार आणि गोदामधारकांवर कारवाई केली जाणार असून, नियमभंगासाठी पाच ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
मुंबईत प्लास्टिक वापरणं महागात पडणार
मुंबईत प्लास्टिक वापरणं महागात पडणार

मुंबई : मुंबई शहरात प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी अधिक कठोर करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. सणासुदीच्या काळात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे लक्षात घेऊन पालिकेकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या कारवाईत केवळ फेरीवाले आणि दुकानदारच नव्हे, तर प्लास्टिकचा साठा करणाऱ्या गोदामधारकांवरही कारवाई केली जाणार आहे.

राज्यात प्रतिबंधित असलेल्या प्लास्टिकच्या विक्री, साठवणूक आणि वापरावर पालिकेची नजर राहणार आहे. विशेषतः 50  मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर किंवा साठवणूक आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी दुकाने, फेरीवाले, आस्थापना आणि गोदामांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्यांदा नियमभंग केल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडाची रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत वाढेल. तिसऱ्यांदा नियम मोडल्यास संबंधितांकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतरही शहरातील अनेक भागांमध्ये प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

एप्रिल 2025 ते जुलै 2026 या कालावधीत पालिकेने केलेल्या कारवाईत तब्बल 7 हजार 505 किलो प्लास्टिक आणि थर्माकोल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईतून पालिकेने 1 कोटी 30 लाख 95  हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू असली तरी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्याचे आव्हान प्रशासनासमोर कायम आहे.

प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करताना पालिकेला मनुष्यबळाची कमतरताही भासत आहे. दुकाने व आस्थापना विभागातील 127 मंजूर पदांपैकी 72 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कारवाईचा अतिरिक्त भार पडत आहे.

ही कमतरता भरून काढण्यासाठी पालिकेच्या इतर विभागांमधील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात प्लास्टिकबंदीची तपासणी आणि कारवाई अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version