Saturday, February 14, 2026 03:17:27 AM

Ajit Pawar Bodyguard Vidip Jadhav Martyred : सावलीसारखे राहिले सोबत.. शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही साथ! अजित पवारांच्या विमान अपघातात अंगरक्षक विदीप जाधव यांचं निधन

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव हे 2009 च्या बॅचचे कॉन्स्टेबल होते. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते.

ajit pawar bodyguard vidip jadhav martyred  सावलीसारखे राहिले सोबत शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही साथ अजित पवारांच्या विमान अपघातात अंगरक्षक विदीप जाधव यांचं निधन

Ajit Pawar's Bodyguard Vidip Jadhav Martyred : बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राने एक धडाडीचा नेता गमावलाच, पण या दुर्घटनेत एका निष्ठावान पोलीस अधिकाऱ्याचीही प्राणज्योत मालवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सुरक्षा रक्षक (PSO) विदीप जाधव हे या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बुधवारी सकाळी 8:11 वाजता मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर घेऊन विदीप जाधव विमानात त्यांच्यासोबत बसले, मात्र सकाळी 8:44 च्या सुमारास लँडिंग दरम्यान झालेल्या स्फोटात त्यांचाही दुर्दैवी अंत झाला.

मुंबई पोलीस दलातील '2009' च्या बॅचचा हिरा
विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलातील 2009 च्या बॅचचे कॉन्स्टेबल होते. मागील काही काळापासून ते अजित पवार यांच्या सुरक्षा ताफ्यात वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीवर तैनात होते. एक शिस्तबद्ध, सतर्क आणि शांत स्वभावाचा अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची मोठी ख्याती होती. ठाण्यातील विटावा परिसरात राहणारे विदीप जाधव आपल्या कामाप्रती इतके समर्पित होते की, अजित पवार यांचे दौरे असोत किंवा रात्री-अपरात्री होणाऱ्या सभा, विदीप जाधव सावलीसारखे नेहमी त्यांच्यासोबत उभे असायचे.

विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते परिचित होते. विमान दुर्घटनेतील त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रचार बैठकांसाठी अजित पवार आज बारामतीला जात असताना ही दुर्घटना घडली. कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान अपघातात जाधव यांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा - Ajit Pawar Death : 'मी त्यांच्या विरोधात जीव तोडून लढले.. पण आज खूप वाईट घडलं'; अजित पवारांना अंजली दमानियांनी वाहिली श्रद्धांजली

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अखेरचा प्रवास
आज सकाळी 6:30 वाजता विदीप जाधव घरातून कर्तव्यावर जाण्यासाठी बाहेर पडले होते. जाताना त्यांनी नेहमीप्रमाणे हसतमुखाने शेजाऱ्यांकडे हात उंचावून निरोप घेतला होता, जो त्यांचा अखेरचा निरोप ठरेल अशी कोणालाही कल्पना नव्हती. ज्या नेत्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले, त्या नेत्यासोबतच विदीप जाधव यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. विमान अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे त्यांचे पार्थिव ओळखणेही कठीण झाले होते, जे त्यांच्या कर्तव्यावरील पराकोटीच्या निष्ठेची साक्ष देते.

पोलीस दलासह ठाणे परिसरात शोककळा
विदीप जाधव यांच्या निधनामुळे मुंबई आणि ठाणे पोलीस दलात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, 14 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. आपल्या हक्काचा माणूस आणि घराचा आधारस्तंभ गेल्याने जाधव कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. कर्तव्यावर असताना बलिदान दिल्यामुळे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'सावली' म्हणून वावरणाऱ्या विदीप जाधव यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सुनेत्रा पवारांचे सांत्व


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या