राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेली पिके करपल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याचे सांगण्यात येत असून, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले.
राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजासाठी 5,000 रुपयांची अग्रिम (अगोदर मिळणारी) मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थानच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या वतीने गोरक्ष गाडीलकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹5,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार किसन कथोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने संस्थानने हा पुढाकार घेतला आहे. या मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असून, संकटाच्या काळात सामाजिक संस्थांकडून मिळणाऱ्या सहकार्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.