बीड : दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्यातील माली पारगाव येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर उपस्थित केला.
दुष्काळ जाहीर झाल्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष मदत ताटात कधी वाढणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. “ताई, ताटात वाढा. ताटात येण्याची आम्ही वाट पाहत आहोत; पण ताटात काही येत नाही,” अशा शब्दांत एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. केवळ घोषणा करून काय होणार? मदत मिळण्याची वाट पाहत असताना शेतकरी उपाशी मरतोय, असा आक्रोशही यावेळी करण्यात आला.
शेतकऱ्यांनी “पोटावर मारू नका, पाठीवर मारा,” अशी म्हण सांगत सरकारने संकटाच्या काळात प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांचा हा आक्रोश ऐकल्यानंतर सुनेत्रा पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
“मी शेतकऱ्याच्या पोटावर पाय द्यायला आलेली नाही, तर शेतकऱ्यांना आधार द्यायला आले आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या भावना आपल्याला समजतात आणि दुष्काळाची परिस्थिती काय असते, याची जाणीव असल्याचेही त्यांनी म्हटले.
“उगाच आपलं काहीतरी बोलायचं नसतं. शेतकरी बांधवांसाठी रानात, बांधावर आले आहे,” असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाची घोषणा आजच झाल्याचे सांगत मदतीबाबत सरकारकडून कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी तातडीच्या मदतीची मागणी लावून धरली असता, “येईल, येईल ताटात पण येईल,” असे सांगत सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांचा आक्रोश आणि उपमुख्यमंत्र्यांशी झालेला थेट संवाद चर्चेचा विषय ठरला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.