सणासुदीच्या आणि दिवाळीच्या दिवसांत मिठाई, फराळ व खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम तीव्र करण्याचे स्पष्ट केले आहे. ऐन सणांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर व उत्पादकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा त्यांनी दिला आहे.
दिवाळीत फराळ अन् मिठाईच्या विक्रीवर कडक देखरेख
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चकली, चिवडा, शेव, फरसाण आणि विविध प्रकारच्या मिठाईची मागणी प्रचंड वाढते. हीच बाब लक्षात घेऊन एफडीएने आपली तपासणी मोहीम अधिक व्यापक केली आहे. मुदत संपलेले किंवा निकृष्ट दर्जाचे जिन्नस वापरून तयार केलेल्या फराळाची विक्री रोखण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, दिवाळीचा सण पूर्ण होईपर्यंत ही धडक कारवाई अशीच अविरत सुरू राहणार असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
19 कोटींपेक्षा जास्त किमतीचे भेसळयुक्त मसाले जप्त
गेल्या काही दिवसांत FDA ने केलेल्या मोठ्या कारवायांची आकडेवारी जाहीर करताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, मसाले तयार करणाऱ्या तब्बल 1,057 संस्थांची सखोल तपासणी करण्यात आली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 94 आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत. तसेच विविध गोडाऊन आणि कारखान्यांवर छापे मारून 11,963 क्विंटल मसाले व मसालेजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण बाजारातील किंमत सुमारे 19.69 कोटी रुपये इतकी आहे.
हेही वाचा – गोकुळची अध्यक्ष निवड कोरमअभावी तहकूब; महायुतीचे 12 संचालक गैरहजर
विक्रेत्यांना आणि दुकानदारांना सतर्कतेचे निर्देश
सणासुदीच्या काळात दूषित आणि भेसळयुक्त अन्नामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आजारपणाचा धोका वाढतो. त्यामुळे सर्व व्यापारी, उत्पादक आणि दुकानदारांनी स्वच्छतेचे नियम पाळावेत व चांगल्या दर्जाच्याच वस्तूंची विक्री करावी, असे निर्देश एफडीएने दिले आहेत. या कडक भूमिकेमुळे भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून मात्र FDA च्या या धडक मोहिमेचे मोठे स्वागत केले जात आहे.