अमरावती-नागपूर महामार्गावर तिवसा तालुक्यातील वरखेड फाट्यानजीक भीषण अपघात घडला आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली असून या अपघातात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. निखिल बोके आणि कैलास कळंबे अशी मृत तरुणांची ओळख असून या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोघेही उंबरखेड येथील रहिवासी आहेत. तिवसा येथून आपल्या गावी परतत असताना वरखेड फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांनाही जीव गमवावा लागला. या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे कैलास कळंबे यांच्या पत्नी आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत. पुढील महिन्यात त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार होते.
मात्र, बाळाच्या जन्माआधीच नियतीने त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हिरावून घेतले. ज्या घरात काही दिवसांत आनंदाचे वातावरण निर्माण होणार होते, त्या घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन तरुणांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातादरम्यान ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.