महाराष्ट्रात सध्या काही भागांत विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस तर किनारी भागात हवामान उष्ण आणि दमट राहील. यावेळी महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांवर उष्णतेचा प्रभाव राहणार आहे, तसेच 5 जिल्ह्यांना वेगवान वाऱ्यांचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस मोठ्या हवामान बदलांची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेसोबतच ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रत पुणे, सातारा, सांगली येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात अकोला, वाशिम, नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट कायम असून तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- Farmer Loan Waiver Scheme: बळीराजासाठी सर्वात मोठी बातमी! 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; फडणवीस सरकारची कर्जमाफीची ब्ल्यूप्रिंट तयार
यावेळी कोकणात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी कमाल तापमान 30-39 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता राहणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान 36-41 अंशांपर्यंत असून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून जळगावचे तापमान हे 40 पार गेले आहे. तर नाशिक जिल्ह्यात पारा 42.8 झाला असून उन्हाचा तडाखा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येत असून वाढत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट झाले आहेत.
तसेच मराठवाड्यात कमाल तापमान 43-46 अंशांच्या दरम्यान असून नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा येथे कमाल तापमान 40-44 अंशांपर्यंत असून हवामान कोरडे राहील. सततच्या वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचे आणि आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. उन्हापासून संरक्षणासाठी प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.