मुंबईतील असंख्य रेल्वे प्रवाशांसाठी आणि वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकावरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल अखेर सुरु होणार आहे. या पुलाचे बहुतांश काम हे पूर्ण झालेले असून लवकर या पुलावरुन वाहने धावणार आहे. जाणून घ्या कधीपासून करता येणार या पुलावरुन प्रवास?
विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणी आता अधिक वेगवान
खरं तर या पुलामुळे विद्याविहार पूर्व तसेच पश्चिमेला जोडत असलेला प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे. पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग हे या पुलामुळे थेट जोडले गेलेले आहे. या पुलाची साधारण लांबी सुमारे 650 मीटर आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पूल दुपदरी असून रेल्वे रुळांवरील 100 मीटरचा मुख्य पूल आणि दोन्ही बाजूंना जोडरस्ते बांधण्यात आलेले आहेत.
हेही वाचा-रविवारी लोकलचा खोळंबा! मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर
विद्याविहार उड्डाणपूल कधी सुरू होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकावरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल अखेर आज, 10 ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. शिवाय या पूलाच्या पूर्वेला 220 मीटर तर पश्चिमेला 330 मीटर इतके लांबीची जोडरस्ते तयार केले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना रेल्वे फाटकावर अडकून पडण्याचा त्रास पूर्णपणे संपणार आहे आणि वाहतूक कोंडीतूनही मोठी सुटका होणार आहे. एवढेच नाही तर, या पुलाला विद्याविहार स्थानकाच्या पादचारी मार्गांनाही जोडण्यात आले आहे.