दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अचानक प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याची घटना घडली आहे. पक्षाचे सदस्य सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आगामी मोर्चाची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नेहा बोरा आणि अभिजीत दीपके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, वार्ताहर परिषद सुरू असतानाच काही लोकांनी तीव्र घोषणाबाजी करत “पत्रकार परिषद बंद करा” अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या गदारोळानंतर प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके यांनी संताप व्यक्त केला. अवघ्या 50 ते 100 रुपयांच्या आमिषाला बळी पडणारे हे भाडोत्री लोक असून त्यांनीच हा गोंधळ घातल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
जंतर मंतरवरील जमावबंदी उल्लंघनाप्रकरणी 2 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक
दिल्लीतील प्रसिद्ध जंतर मंतर परिसरात सर्व प्रकारच्या आंदोलनांवर तसेच निदर्शनांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली असून तिथे कलम लागू करून जमावबंदी करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करत आशुतोष रांका आणि सौरभ दास हे आपल्या काही सहकाऱ्यांसह जंतर मंतरवर पोहोचले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आपल्या सहकाऱ्यांवर झालेल्या या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
शुक्रवारी कॅनॉट प्लेस येथे मोर्चा
आपल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी आणि पोलीस कारवाईचा विरोध करण्यासाठी पक्षाच्या वतीने शुक्रवारी मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. या आंदोलनाची रूपरेषा सांगण्यासाठीच ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. अभिजित दिपके यांनी गुरुवारीच कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता सर्वांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात मोठ्या संख्येने एकत्रित यावे. या पत्रकार परिषदेत निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापले आहे.