Jain Nagari Controversy: मिरा-भाईंदर शहराला ‘जैनांची नगरी’ असे संबोधून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटवणारे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी अखेर आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. ठाण्यात आयोजित एका जैन समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मेहता यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचा संदर्भ देत हे विवादित वक्तव्य केले होते. शहरातील आमदार, महापौर आणि 9 नगरसेवक जैन समाजाचे असल्याचा दावा करत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले होते. मात्र, या विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून, स्थानिक मराठी नागरिक आणि राजकीय पक्षांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली होती.
शिवसेना आणि मनसेचा जोरदार हल्लाबोल
आमदार नरेंद्र मेहता यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि मराठी एकीकरण समितीने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेने मेहता यांच्यावर निशाणा साधत शहराचा मूळ इतिहास समजून घेण्यासाठी स्वतःच्याच शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचा सणसणीत टोला लगावला होता. तसेच निवडणुकीच्या वेळीच इतर समाजाची आठवण येते का, असा सवाल करत माफीची मागणी केली होती. दुसरीकडे, मनसेने शहरात जातीय आणि सामाजिक सलोखा बिघडवणारी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा देत आंदोलनाचा इशारा दिला होता.
हेही वाचा – विधानपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय चुरस! अवघ्या 3 दिवसांत 145 इच्छुकांचे अर्ज दाखल; मोठ्या नावांची एन्ट्री ?
वाढत्या वादानंतर मेहतांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण
चौफेर वाढणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी गुरुवारी तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मिरा-भाईंदर हे मूळचे आगरी, कोळी आणि मराठी बांधवांचेच शहर आहे, असे सांगत त्यांनी सर्व समाजांबद्दल आपल्याला आदर असल्याचे नमूद केले. “माझे वक्तव्य केवळ एका धार्मिक कार्यक्रमापुरते मर्यादित होते आणि त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कोणत्याही समाजाच्या किंवा मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत त्यांनी निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.