मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुंबईतील शिवाजी पार्क येथे निदर्शने करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर मुंबई पोलिसांनी कायदेशीर बडगा उगारला आहे. शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी दादर येथील शिवाजी पार्क परिसरात CJP कडून हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विनापरवाना एकत्र येऊन आंदोलन केल्याप्रकरणी दादर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह सर्व आंदोलकांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंदोलन येत्या काळात अधिक तीव्र करण्याचा CJP चा दावा
मागील आंदोलनांच्या तुलनेत शुक्रवारी पार पडलेल्या या निदर्शनांना नागरिकांची उपस्थिती काहीशी कमी लाभली असली, तरी नवोदित तरुण (Gen-Z) आणि विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलनातील कमी गर्दीबाबत बोलताना CJP च्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही मोठ्या जनआंदोलनाची ही केवळ सुरुवात असते. पहिला मुद्दा जनतेच्या दरबारात पोहोचावा लागतो, त्यावर सखोल विचारमंथन होते आणि त्यानंतरच मोठा जनसमुदाय एकत्र येतो. आगामी काळात हे आंदोलन अधिक आक्रमक आणि व्यापक स्वरूपात देशाच्या विविध भागांत नेण्याची आखणी केली जात असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – महायुतीत बिनसलं? पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा; एका जागेसाठी रस्सीखेच
‘मुंबई चलो’नंतर आता देशव्यापी आंदोलनाची तयारी
CJP आणि संलग्न विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिवाजी पार्क येथील आंदोलन ही केवळ एक पूर्वपिठिका होती. येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने हे आंदोलन महाराष्ट्राबाहेर देश पातळीवर नेण्याचा संघटनेचा मानस आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत देशातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि तरुण पिढीला या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असून, पुढील काळात कायदेशीर लढाई लढत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.