महाराष्ट्र राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती येथील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीचे प्राथमिक कल समोर येऊ लागले आहेत. टपाली मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मतपत्रिकांची गणना वेगाने सुरू झाली आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवारांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळत असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील चुरस
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव-देशमुख यांनी पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत प्राथमिक आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर आहेत, तर विद्यमान आमदार जयंत आजगावकर पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकासाठी अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप यांच्यात मुख्य लढत सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीतील स्थिती
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांनी 137 मते मिळवून 37 मतांची आघाडी घेतली आहे, तर डॉ. प्रतापसिंह पाटील 100 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. येथे ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांना 31 मते आणि रविराज साबळे यांना 19 पोस्टल मते मिळाली आहेत. याशिवाय नागपूरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी कायम ठेवली आहे, तर अमरावतीमध्ये महायुतीचे किरण सरनाईक हे 1500 मतांनी पुढे चालत आहेत.
हेही वाचा – “प्रकल्प झाला नाही तर…,त्यासाठी झाडे तोडावी लागेल” विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
अवैध मते आणि मतपत्रिकेत आढळलेल्या मागण्यांच्या चिठ्ठ्या
या मतमोजणीदरम्यान एक अत्यंत रंजक प्रकार समोर आला आहे. चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे अनेक मते अवैध ठरली आहेत. इतकेच नव्हे तर, काही मतदारांनी थेट मतपत्रिकेतच आपल्या विविध मागण्यांच्या चिठ्ठ्या टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने अंशतः अनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान द्यावे आणि जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी अशा मागण्यांचा समावेश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.