अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या बहुचर्चित आणि चुरशीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून महायुतीचे (शिवसेना शिंदे गट) उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीत किरण सरनाईक यांनी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत महाविकास आघाडीच्या (काँग्रेस) उमेदवार अदिती पोहरे यांचा पराभव केला. दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या १६ हजार १३४ मतांचा किरण सरनाईक यांच्याकडून कोटा पूर्ण झाला असून सरनाईक यांनी सलग दुसऱ्यांदा शिक्षक मतदार संघात बाजी मारली आहे. किरण सरनाईक यांना १६ हजार ६६३ मते पडली असून काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना ८६३६ मते मिळाली आहे.
दरम्यान, भाजपामधून बंडखोरी झाली नसती तर मी पहिल्या फेरीत घेऊन आलो असतो, अशी प्रतिक्रिया किरण सरनाईक यांनी विजयानंतर दिली. सरनाईक यांच्या विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला. सरनाईक यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संगीता शिंदे व शेखर भोयर यांनी बंडखोरी केली. मात्र तरी देखील किरण सरनाईक यांनी एकतर्फी विजय मिळवला. भाजपमधून ही बंडखोरी झाली नसती तर कदाचित पहिल्या पसंतीच्या मताने मी निवडून आलो असतो, मात्र लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी पक्षाचा आदेश मानला असता तर कदाचित माझ्यासाठी निवडणूक सोपी झाली असती, अशी प्रतिक्रिया किरण सरनाईक यांनी दिली. यावेळी किरण सरनाईक यांच्यासह समर्थकांनी जल्लोष केला.