माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांना अटक करण्याच्या मागणीसाठी पूर्णेकर समर्थकांनी घोडबंदर रोड मानपाडा येथे रास्ता रोको केल्यानंतर आता कापूरबावडी नाका येथे रास्ता रोको केला आहे. पूर्णेकर समर्थकांनी केलेल्या रास्ता रोको मुळे संपूर्ण घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांना न्याय देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यात वातावरण तापलं आहे.
हेही वाचा- मुंबईत सुनेत्रा पवारांनी भाकरी फिरवली; झिशान सिद्दीकी यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के विरोधकांना आव्हान देत म्हणाले की, “उद्या ठाण्यात येऊन शिंदे साहेबांवर आरोप केले तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही. उद्याच्या आंदोलनात चुकीचं वक्तव्य केलं तर तो नेता ठाण्यातून परत जाणार नाही. ही धमकी समजायची आहे तर धमकी समजा. मेलेल्याच्या टाळू वरील लोणी खाण्याचे काम हे लोक करत आहेत, सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलत आहेत.”
“शिवसेना गप्पा बसणार नाही, काल जे झाले त्यानंतर आता जशास तसे उत्तर दिले जाईल. प्रताप सरनाईक त्या कुटुंबाच्या घरी जाऊन आले, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे बोलणे करून दिले, तरी बदनामी केली जात आहे. काल अनेक तास रस्ते बंद करण्यात आले, कालच आम्ही त्यांना विरोध करू शकलो असतो पण आम्ही केला नाही. पण आता शिंदे साहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. चुकीच्या पद्धतीने वागणार असाल तर ठोशास ठोसा देऊ. जर तुम्ही ठाण्यात येऊन शिंदे साहेबांवर आरोप केले तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.